वैकफील्ड कंपनीत सौरऊर्जा प्रकल्प

लोणीकंद, बकोरी युनिट येथे उपक्रम; 1430 किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प

वाघोली- वैकफील्ड फूड्‌स प्रायव्हेट लि. कंपनीच्या लोणीकंद व बकोरी युनिटमध्ये 1430 किलोवॅटक्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. वैकफील्ड कंपनीने पारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या प्रकल्पाचे औद्योगिक विभागातून कौतूक केले जात आहे.

कंपनीच्या लोणीकंद युनिटमध्ये 213 किलोवॅट व बकोरी युनिट येथे 1217 किलोवॅट असे एकुण 1430 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. कंपनीच्या 63व्या संस्थापनदिनाचे औचित्य साधून कंपनीच्या एमडी अश्विनी मल्होत्रा व सन शॉट कंपनीचे संचालक इंद्रजित दुदिले यांनी या सौरऊर्जा केंद्राचे उद्‌घाटन केले. थिंक एनर्जी पार्टनर यांनी या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून वर्षाला अंदाजे 21 लाख युनिट्‌सपर्यंत विजेची निर्मिती होणार असून त्यातून वार्षिक लाखो रुपयांची बचत होणार आहे. त्याचबरोबर कार्बन डायऑक्‍साइड उत्सर्जनामध्ये वर्षाकाठी 1350 टनाची घट होणार असल्याची माहिती कंपनीचे एचआर मॅनेजर योगेश सातव यांनी दिली. औद्योगिक विभागातील कंपन्यांनी सौरऊर्जेचा वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी मदत करावी, असे आवाहन वैकफील्ड कंपनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.