वेल्ह्यातील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष

एक किलोमीटर हंड्यावर हंडा घेवून करावी लागतेय पायपीट

वेल्हे- वेल्हे तालुक्‍यातील रायदंडवाडी गाव पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. घिसर गावापासून दोन किमीवर असणाऱ्या रायदंडवाडी गावात धनगर समाज मोठ्या संख्येने राहतो. येथील नागरिक आजही तहानेने व्याकुळ झाले आहेत. डोंगराच्या पायथ्याला राहणारे धनगर बांधव वर्षांनवर्ष पाण्यासाठी भटकंती करीत आहे.

महिला, पुरूष डोक्‍यावर पाण्याचे दोन-तीन हांडे एकाच वेळी दुडीवर दुडी घेऊन पाणी वाहताना दिसत आहेत. सगळा दिवस पाणी भरण्यासाठी जात असल्याने मजुरी काम करणाऱ्यांसमोर आज काय खायचे याची समस्या आहे. रस्त्याची कोणतीच सोय नसल्याने गाडी किंवा बैलगाडीवर पाणी भरता येत नाही. त्यामुळे नागरिकांना एक ते दोन किमी चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे.

पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने येथील नागरिक पुणे या ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत. गावात पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांना आपल्या गाई, म्हैशी विकाव्या लागत असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. दोन घोट पाणी भरण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. दगड-धोंडे पालथे घालत, खाच-खळगा खात दोन घोट पाण्यासाठी महिलांना आपला जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. पाण्याच्या भीषण टंचाईमुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत चालली आहे. रायदंडवाडीतील विद्यार्थी, चिमुकले सुद्धा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत.

  • खेळण्याच्या दिवसात मुले भरतात पाणी
    उन्हाळाच्या सुट्टयांमध्ये मुलांचे खेळण्याचे, बागडण्याचे दिवस असतात. परंतु, सुटीमध्ये खेळाचे सोडून रायदंडवाडीतील मुले बैलासारखी पाणी वाहत आहेत. शाळेतून घरी येताना पाठीवरचे वह्या पुस्तकांचे ओझे उतरावयाचे आणि घरी आल्यावर डोक्‍यावर हंड्याचे ओझे घ्यायचे, अशा भयानक विचित्र परिस्थितीला विद्यार्थी तोंड देत आहेत. कधी या लोकांना पिण्याच्या पाण्याचा मुलभूत हक्‍क मिळणार? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. अशी विचित्र आणि भयानक परिस्थिती पाहून माय बापला सरकारला कधी पाझर फुटणार? का केवळ मतापुरताच ग्रामस्थांचा वापर होत राहणार? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
  • आम्हाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडून कोणतेच सहकार्य मिळत नाही. शाळा बुडवून पाण्यासाठी 1 किमी पायपीट करावी लागत आहे. सुटीत फिरायला जावे तर घरच्यांनी पाणी भरायला जुंपले आहे. कसे जगावे हे आमच्या आई-वडिलांना कळेनासे झाले आहे. आमची जनावरेही पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत.
    – तानाजी कचरे, विद्यार्थी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.