वृद्ध मातेला घराबाहेर काढणाऱ्या दाम्पत्याला दणका

मुलगा-सुनेला घर सोडून जाण्याचा अंतरिम आदेश

पुणे – नावावर घर असतानाही शारीरिक, मानसिक त्रास देत 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेला घराबाहेर काढणाऱ्या मुलगा आणि सुनेला न्यायालयाने चपराक दिली आहे. दोघांना घराबाहेर जाण्याचा अंतरिम आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी दिला आहे. वृद्धेला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. मार्चमध्ये दाखल झालेल्या दाव्यात तीन महिन्यांतच अंतरिम आदेश देत न्यायालयाने वृद्धेला दिलासा दिला आहे.

उच्चशिक्षित असलेल्या माधव आणि माधवीचा (दोघांची नावे बदलली आहेत) विवाह झाला. ती पुण्यात माधवच्या घरी नांदण्यास आली. घरात 80 वर्षाची सासू सोनाबाई (नाब बदलले आहे) होती. काही दिवसांत सासू-सुनेमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. यातून विकोपाला गेलेल्या भांडणातून एके दिवशी सुनेने सासूला घराबाहेर काढले.

यावेळी स्वतःचे घर असताना सासूला घराबाहेर काढल्याने ती मुलीकडे गेली. मुलगी सांभाळेल, या आशेवर ती दहा- बारा दिवस मुलीकडे राहिली परंतु, मुलीनेही तिचा सांभाळ करण्यास असहमती दाखवली. त्यानंतर तिला वृद्धाश्रमाशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. तेथे राहत असताना तिने सुनेने व्यवस्थित वागणूक न दिल्याने घराबाहेर काढल्याने सून आणि मुलाविरुद्ध ऍड. स्मिता देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात कौटुंबीक छळाचा दावा दाखल केला.

याप्रकरणात न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सून उपस्थित झाली. सासरच्या घरी राहणे हा माझा कायदेशीर अधिकार असल्याचे तिने नमूद करताना मलादेखील राहण्यास द्यायला हवे, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यावर ऍड. देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले, “सासूचे स्वतःचे घर असताना सुनेने तिला घराबाहेर काढले आहे. तिला सध्या कोणाचाही आसरा नाही, मुले असतानाही तिच्यावर ही वेळ आली आहे. वृद्ध असल्याने त्यांना मोठ्याने आवाज, भांडणे सहन होत नाही. त्यामुळे सुनेसह मुलाला घराबाहेर जाण्याचे आदेश देण्यात यावे,’ अशी मागणी ऍड. देशमुख यांनी केली. न्यायालयाने सासूने दाखल केलेला दावा मान्य करताना सुनेसह-मुलाला घराबाहेर जाण्याचा अंतरिम आदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)