वीस वर्षांपूर्वीच्या स्मृती ताज्या झाल्या- डेसचॅम्प्स 

फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी मिळविला दुर्मिळ दुहेरी बहुमान 
पॅरिस – वीस वर्षांपूर्वी फ्रान्सने मिळवलेल्या विजयाच्या माझ्या स्मृती या विजयामुळे ताज्या झाल्या आहेत. तो विजय तर फ्रान्समध्ये मिळवलेला असल्याने तिथेदेखील असाच जल्लोष झाला होता. त्या संघात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून असल्याने त्याच्या स्मृती तर माझ्या मनात चिरंतन राहणारच आहेत. मात्र हा विजयदेखील त्या विजयाइतकाच मोठा आणि अफलातून असल्याचे मत प्रशिक्षक दिदिएर डेसचॅम्प्स यांनी व्यक्‍त केले.

दिदिएर डेसचॅम्प्स यांनी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाविरुद्ध 4-2 ने विजय मिळविल्यानंतर पत्रकार परिषदेत खेळाडूंच्या साथीने जल्लोष करीत नृत्यही केले. त्यांच्यावर शॅम्पेनचा वर्षाव केल्यानंतर ते म्हणाले की, “फ्रान्स सध्या आनंदसागरात बुडालेला आहे.’ ते बोलण्यास सुरुवात करीत असतानाच पत्रकारांची गर्दी असलेल्या कक्षात खेळाडू दाखल झाले. यावेळी बचावपटू बेंजामिन मेंडी जल्लोषाचे नेतृत्व करीत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेसचॅम्प्स यांनी फ्रान्सच्या दुसऱ्या विश्वविजेतेपदाबरोबरच एक दुर्मिळ बहुमानही मिळविला आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्‍वचषक जिंकणारे ते इतिहासातील केवळ तिसरी व्यक्‍ती ठरले आहेत. ब्राझीलचे मारियो झागालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकनबावर या दोघांनी हा मान मिळविला आहे.याआधी 1998 मध्ये पॅरिसमध्ये ब्राझिलविरुद्ध 3-0 ने विजय मिळवणाऱ्या फ्रान्स संघाचे ते कर्णधारही होते. डेसचॅम्प्स म्हणाले,”माझी कथा खेळाडूंसोबत जुळलेली आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एक खेळाडू म्हणून 20 वर्षांपूर्वी मला याचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. ते सर्व फ्रान्समध्ये घडले होते. आता जी मुले 10, 15, 20 अशा वयोगटांत आहेत, त्यांच्यासाठी हा विजय म्हणजे त्यांच्या आयुष्यभरासाठी आनंदाच्या स्मृती आहेत. तसेच जे 23 खेळाडू संघातून खेळले ते एकमेकांशी बांधले गेले असून त्यांच्यासाठी हा आयुष्यभराचा ठेवा आहे. विश्वविजेत्या संघाचा घटक असणे यापेक्षा जगात काहीच मोठे नसते.

यापूर्वी 2016-युरो चषकाच्या अंतिम सामन्यात आम्हाला पोर्तुगालकडून पराभव पत्करावा लागला. मात्र आम्ही कदाचित युरो चषक जिंकला असता, तर विश्‍वचषक जिंकू शकलो नसतो असेही मला वाटत आहे, असे सांगून डेसचॅम्प्स म्हणाले की, अर्जेटिनावर 4-3 ने मिळवलेला विजय आणि त्यात एम्बापेने केलेले अफलातून गोल यामुळे संघाच्या वाटचालीला गतीसह आत्मविश्वासाचे कवच लाभले. त्यानंतर उरुग्वे आणि बेल्जियमवरील विजय आमच्यासाठी सर्वाधिक मोलाचा ठरला. तिथून आम्ही विश्वविजेते बनण्याच्या आशा बळावल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)