वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव

 

पाथर्डी – गेल्या आठ दिवसापासून शहरातील विजेच्या सुरू असलेल्या लपंडावच्या पार्श्‍वभूमीवर माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड व नगरसेवक रामनाथ बंग यांच्या नेतृत्वाखालील शेकडो नागरिकांनी वीज महामंडळाच्या कार्यालयात जाऊन विज महामंडळाचे सहाय्यक अभियंता मयुर जाधव यांना घेराव घातला. सध्या शहरातील वीजपुरवठ्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी जाधव यांना चांगलेच धारेवर धरले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून शहरातील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. कमी-अधिक प्रमाणात वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या घरातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जळून लाखोचे नुकसान झाले आहे. विजबिल भरूनही वीज महामंडळाकडून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. वीज पुरवठा कायम खंडित होत असल्याने रात्री शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत न केल्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा आव्हाड यांनी यावेळी दिला.

रामनाथ बंग म्हणाले, विद्युतपुरवठा गेला तर रात्री कर्मचारी फोन उचलत नाहीत. उचलला तर नागरिकांशी उद्धटपणे बोलतात. प्रत्येकाने टेम्परवारी वायरमनची नेमणूक केलेली आहे. त्यांना लोकांचे देणेघेणे नाही. यावेळी विज महामंडळाचे सहायक अभियंता मयूर जाधव म्हणाले , यापुढे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर लवकरात लवकर सुरळीत करू, संबंधित विभागाचा वायरमन कामात कुचराई करत असल्यास कारवाई करू, ज्या परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असेल त्या परिसरातील नागरिकांना त्याबद्दल व्हाट्‌सअप मार्फत माहिती देऊ, असे आश्‍वासन यावेळी दिले.

आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना राऊत, अण्णा हारेर, घरकुल संघटनेचे अध्यक्ष सलीम भाई शेख, युवानेते अभिजीत गुजर ,प्रशांत रोडी, प्रा. सुरेश कुलथे, शाहनवाज भाई शेख, सचिन शेटे, माऊली कोकाटे, सोमनाथ रोडे, प्रदीप गायकवाड, संदीप काकडे, योगेश कलंत्री आदी शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.