वीजग्राहकांना तातडीने वीजमीटर देणार

पंधरा दिवसांतच प्रभावी अंमलबजावणी

पुणे- वीजमीटर मिळविण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेटिंगवर असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे; या ग्राहकांना तातडीने वीजमीटर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाची येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे महावितरणच्या महसूलामध्येही भरीव वाढ होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्य शासन आणि महावितरण प्रशासनाच्या वतीने गोरगरीब आणि विशेषत: आदिवासी भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यानुसार या नागरिकांच्या घरात वीजपुरवठा करण्यात आला होता, ही योजना प्रभावीपणे राबविल्याने राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वीजमीटरचा तुटवडा जाणवत होता. बहुतांशी ग्राहकांनी वर्षभरापूर्वी वीजमीटरसाठी अर्ज दाखल केले होते. त्याशिवाय त्याची अनामत रक्‍कमही भरली होती.

मात्र; वीजमीटरचा तुटवडा असल्याने वर्षभराचा कालावधी उलटूनही या ग्राहकांना नव्याने वीजजोड मिळू शकले नव्हते. त्यामुळे महावितरण प्रशासनाच्या महसुलातही घट झाली होती. त्याशिवाय ग्राहक आणि महावितरणचे अधिकारी यांच्यातील वाद आणखीनच वाढत चालला होता. त्यामुळे ही परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी महावितरणचे मुख्य कार्यालय आणि प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने काही महिन्यांपासून प्रयत्न करण्यात येत होते. त्यांच्या या प्रयत्नांना अपेक्षित यश आले आहे. त्यानुसार येत्या पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत प्रादेशिक कार्यालयाला वीजमीटरचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरण आणि विशेषत: वेटिंगवर असलेल्या ग्राहकांचा वनवास संपणार आहे. याबाबत महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले; वेटिंगवर असलेल्या ग्राहकांना तातडीने वीजमीटर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या ग्राहकांना वीजमीटर दिल्यानंतर नादुरुस्त वीजमीटर बदलण्यावर भर देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)