दुष्काळाने परिसरातील जलस्रोत आटले
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील तळेगाव-निमोण भाग दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. यंदाही या भागाच्या नशिबी दुष्काळाचे दुष्टचक्र कायम आहे. दुष्काळ सातत्यामुळे जलस्रोत आटले असून, भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली. विहिरी व कूपनलिका कोरड्याठाक झाल्या आहेत.
अवर्षण-प्रवण तळेगाव-निमोण भागात दुष्काळसातत्य कायम आहे. सिंचन सुविधे अभावी तळेगाव-निमोण भाग वाळवंटमय बनला आहे. दुष्काळी स्थितीशी समायोजन करीत शेतकरी गुजराण करीत आहे. वर्षानुवर्ष अत्यल्प पर्जन्यमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली. जमिनीत कूपनलिका घेऊन भूगर्भातील जलस्रोतांचा शोध घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतात. उन्हाळ्याचा तडाखा सुरु झाल्याने भूगर्भातील पाण्याची खोलवर गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असल्याने भविष्यातही शेतकऱ्यांना पाणीटंचाई सामना करावा लागेल, असे दिसते. तळेगाव भागात दुष्काळाच्या दुष्टचक्राने ही स्थिती ओढवली असून, शेती धोक्यात आल्याने शेतकरीवर्ग चिंताक्रांत बनला आहे.