विस्तारित नव्या इमारतीवर भुरट्यांची नजर

पालिका प्रशासन झोपेत : अवघ्या चार दिवसांत इमारतीला अवकळा

– दरवाजांच्या कड्या-कोयंड्या चोरल्या
– 24 तास असलेले सुरक्षारक्षक करतात काय?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – महापालिकेची नवीन विस्तारीत इमारतींचा वापर महापालिका पदाधिकाऱ्यांनी सुरू करून अवघे चार दिवस झालेले आहेत, मात्र या इमारतीला चोरीचे ग्रहण लागले आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्वच्छतागृहांचे दरवाजे, विद्युत संयंत्रांच्या खोलीचे दरवाजे, तसेच प्रेक्षागृहाच्या मुख्य दरवाजाचे तांब्याचे कडी-कोयंडे, बिजागऱ्या दोन दिवसांपूर्वी चोरीस गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या इमारतीत 24 तास सुरक्षा विभागाचा पहारा असतानाही ही चोरी झालेली आहे.

महापालिकेने तब्बल 50 कोटी रूपये खर्च करून ही इमारत बांधली आहे. जून 2017 मध्ये त्याचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. उद्‌घाटनाच्या दिवशीच या इमारतीचे छत गळाले होते. त्यानंतर बांधकामाचा तुकडा कोसळणे, सभागृहात लाकडी ठोकळा पडणे, सभागृहात मोकाट कुत्र्यांचा वावर तसेच या इमारतीच्या कामाच्या सुमारे 10 ते 15 कोटींच्या फाईल गहाळ होणे अशा प्रकारांमुळे ही इमारत चर्चेत राहिली आहे. असे असतानाच; आता या इमारतीत चोरीचा प्रकार समोर आला आहे. मात्र, यामुळे या इमारतीची सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे. ही चोरी किरकोळ असली, तरी या प्रकारांना आळा न घातल्यास या इमारतीत मोठा गुन्हा घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

कोठे झाली चोरी ?

या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर मुख्य सभागृहाचे प्रेक्षागृह तसेच पत्रकार गॅलरी आहे. या मजल्यावर दोन्ही बाजूस स्वच्छतागृहे आहे. तेथील तांब्याचे कोयंडे तसेच बिजागऱ्या उचकटून काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे दरवाजे कोसळले असून हे दरवाजे चक्क बाजूला काढून ठेवण्यात आले आहे. तर ज्या ठिकाणी या बिजागऱ्या काढता आल्या नाहीत, तेथे तोडफोड करून या बिजागऱ्या काढण्यात आल्या आहेत. ही बाब गुरूवारी सकाळी समोर आल्यानंतर शुक्रवारी तातडीने या बिजागऱ्या बसवून पुन्हा दरवाजे कार्यरत करण्यात आले आहे.
 
दारूचा अड्डा

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच पालिकेच्या काही पक्षनेत्यांनी या इमारतीमधील कार्यालयांचा अखेर सोमवारपासून वापर सुरू केला आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये 24 तास सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा आहे. असे असतानाही या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि ग्लास स्वच्छता करताना आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसा इमारतीत नागरिकांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी या इमारतीमध्ये या दारूपार्ट्या रंगत असल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)