अबाऊट टर्न: विषयांतर

हिमांशू

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक मोठी घटना. लग्नानंतर जीवनाला वेगळेच वळण
मिळते. त्यामुळे इतरांच्या लग्नात फारशी चिकित्सा न करता चार अक्षता उडवून लगेच पहिल्या पंगतीला जेवायला बसणारी माणसे स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत मात्र फारच चिकित्सक असतात. लग्नासाठी स्थळं पाहण्याचा पारंपरिक कार्यक्रम आता कमी झाला असला किंवा त्याचे स्वरूप बदलले असले, तरी चिकित्सा मात्र वाढतच चाललीय. मुलीही शिकून-सवरून स्वतःच्या पायावर उभ्या राहात असल्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्यात. अपेक्षा फक्‍त वरपक्षाच्याच असू शकतात, असे मानण्याचा काळ त्यामुळे मागे पडला, हे खूप बरं झाले.

वधू-वर सूचक मंडळेही आता ऑनलाइन झाल्यामुळे मुला-मुलींच्या पसंतीत घरातल्या ज्येष्ठांनी ढवळाढवळ करण्याचे प्रमाण खूपच कमी झालेय. लग्न जुळले तर झटक्‍यात जुळते नाहीतर वर्षानुवर्षे रखडते. उपवर मुला-मुलींना स्वतःच्या जोडीदाराबद्दल इतकी चित्रे दिसतात की मित्रमैत्रिणींच्या जोडीदाराबद्दल ते पूर्वीइतके सिरीअसली बोलत नाहीत. एक मात्र खरं, की सेलिब्रिटींच्या लग्नात मात्र सगळ्यांना भलताच इंटरेस्ट असतो. एकतर टीव्ही चॅनेलवाले सेलिब्रिटींच्या (जमलेल्या-मोडलेल्या) लग्नांची खूपच चर्चा करतात. शिवाय प्रायोगिक तत्त्वावर लग्न करण्याचा सेलिब्रिटींना परवानाच असतो, अशीही सामान्यांची धारणा आहे. त्यामुळे पाहुण्यांच्या घरात न डोकावणारेसुद्धा सेलिब्रिटींच्या घरात मात्र हमखास डोकावतात.

सेलिब्रिटींच्या लग्नाचा विषय निघाला की सलमान खानचे नाव हमखास पुढे येते. किंबहुना सर्वाधिक वर्षे लग्नाचा विषय चर्चेत ठेवण्याचा उच्चांकही सलमानच्याच नावावर नोंदवला गेलाय. अनेकांचा लाडका सल्लूमियॉं “कुणाशी’ लग्न करणार, हा विषय हळूहळू चर्चेबाहेर गेला आणि तो लग्न “कधी’ करणार हा विषय चर्चेचा ठरला. ही चर्चा कदाचित “सल्लूमियॉं लग्न करणार की नाही’ याही वळणाने जाऊ शकली असती; पण खुद्द सलमाननेच आता ती दुसरीकडे वळवलीय. “लग्नसंस्थेवर माझा विश्‍वास नाही,’ असे म्हणून त्याने इतक्‍या वर्षांपासून चर्चा करणाऱ्यांच्या उत्सुकतेवर पाणी ओतलंय.

“भारत’ या नव्या चित्रपटाचे प्रमोशन करण्याच्या निमित्ताने त्याची मुलाखत घेतली गेली. कारण कोणतेही असो, “लग्न कधी करणार,’ हा प्रश्‍न सलमानला प्रत्येक मुलाखतकार विचारतोच. याहीवेळी तो विचारला गेला आणि सलमानने लग्नसंस्थेवरच विश्‍वास नसल्याचे सांगून सगळ्यांना स्तंभित केले. वय वाढत जातं, तसे विचार बदलत जातात असे म्हणतात. किमान लग्नाच्या बाबतीत तरी हे खरं असावे. कारण सलमानचे विचार आधीपासूनच असे असते, तर त्याच्या लग्नाची इतकी चर्चा होण्याचे कारणच नव्हते. त्याने हे आधीच सांगून टाकले असते तर कितीतरी लोकांचा नाहक वाया गेलेला वेळ वाचला असता.

चर्चेत राहणे ही सेलिब्रिटींची गरज असते. चर्चेसाठी कारण कोणते आहे, याचाही विचार अस्सल सेलिब्रिटी करत नाहीत म्हणे! आपल्या वाढत्या वयाकडे पाहून “लग्न कधी करणार’ हा प्रश्‍न काही दिवसांनी लोक विचारेनासे होतील, अशी भीती सलमानला वाटली असावी. म्हणूनच त्याने खुबीने एका नव्याच विषयाला वाचा फोडली. “लग्नावर नाही; पण सहजीवनावर विश्‍वास आहे,’ असे तो म्हणाला. चर्चा करणाऱ्यांनो, आता काढा अर्थ… लढवा तर्कवितर्क… आणि करा टाइमपास!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.