विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा-2019 : भारताचा सलामीचा सामना दोनऐवजी चार जूनला होणार 

कोलकाता – अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून हा सामना पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 2 जून ऐवजी सुधारित वेळापत्रकानुसार 4 जून रोजी खेळवला जाणार आहे. विश्‍वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची आज घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलै 2019 या कालावधीत खेळवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कोलकात्यात आज पार पडलेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली.

पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आपला पहिला सामना 2 जून रोजी खेळणे अपेक्षित होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नियुक्‍त केलेल्या न्या. लोढा समितीने दिलेल्या शिफारसीनुसार आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये किमान 15 दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे. आयपीएल स्पर्धेचा 2019चा मोसम 29 मार्च ते 19 मे या कालावधीत खेळवला जाणार आहे. त्यामुळे विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ खेळणार असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. साखळी फेरीत एकूण 45 सामने होणार असून प्रत्येक संघ साखळी फेरीत नऊ सामने खेळणार आहे. दोन्ही गटांमधील गुणानुक्रमे पहिले दोन असे एकूण चार संघ बाद फेरीत प्रवेश करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)