विश्‍लेषण: चांद्रमोहिमांची सुगी

श्रीनिवास औंधकर
ज्येष्ठ खगोलशास्रज्ञ

चंद्रावर स्वारी करण्याची मोहीम यावर्षी जगभरातील शास्त्रज्ञांना खुणावते आहे. विविध देशांकडून हाती घेण्यात आलेल्या चांद्र मोहिमेच्या कामाला यावर्षी गती मिळाल्याचे दिसत आहे. भारताची चंद्रयान-2 ही मोहीमसुद्धा लवकरच सुरू होत आहे. जगभरात चंद्रमोहिमेविषयी कोणकोणती तयारी सुरू आहे आणि त्यातून हाती नवीन असे काय गवसण्याची शक्‍यता आहे, याकडे अंतरिक्ष विषयातील जाणकारांचे लक्ष लागले आहे. पहिल्या मानवी चंद्रमोहिमेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत असताना नव्या मोहिमांमुळे चंद्राच्या दिशेने मानवाचा नवीन प्रवास सुरू होत आहे.

नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरलेला पहिला मानव. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच तो म्हणाला होता, की हे मानवाचे एक छोटेसे पाऊल आहे; मात्र मानवतेचा खूप मोठा प्रवास आहे. आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला त्या अवतरक (लॅन्डर) यानाचं नाव “ईगल’ असं होतं आणि माणसाच्या दृष्टीने अंतराळातली ती खरोखरची गरुडझेप होती. त्यानंतर अनेक चांद्रवीर चंद्रावर जाऊन आले. मायकेल कॉलिन्सलाही ती संधी मिळाली. हे पहिले चांद्रवीर मुंबईत आले तेव्हा त्यांना पाहण्याची उत्सुकता अनुभवली होती. पृथ्वी सोडून अंतराळातल्या दुसऱ्या एखाद्या भूभागावर माणसाने जाण्याची ती पहिलीच वेळ होती. आजही चंद्र वगळता अंतराळातल्या अन्य भूप्रदेशात माणूस पोहोचलेला नाही. तथापि, अपोलो यानाच्या जमान्यापासूनच अंतरिक्ष क्षेत्रातील शास्त्रज्ञांसाठी चंद्र हे एक आकर्षणकेंद्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या वीस वर्षांमध्ये चंद्राविषयी अनेक मोहिमा विविध देशांकडून आखण्यात आल्या आहेत. अनेक प्रकल्पांवर काम झाले आहे; सुरू आहे. अपोलो यान चंद्रावर उतरल्याच्या घटनेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत असताना मानवाचा चंद्राच्या दिशेने एक नवा प्रवास सुरू होणार आहे. त्यामुळे चंद्र आणि त्याविषयी उत्सुकता असणाऱ्यांसाठी हे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. पन्नास वर्षांपूर्वी 20 जुलै 1969 रोजी पहिली चांद्र मोहीम यशस्वी झाली होती. चंद्रावर पाऊल ठेवल्याचा अमेरिकेचा दावा स्वीकारण्यास रशियाने नकार दिला होता आणि त्यासंबंधी जो तपास सुरू केला आहे, त्याचा निष्कर्षही जगासमोर येणार आहे. यावर्षी चंद्र चर्चेत येण्याचे हेही एक कारण आहे.

काही दिवसांपूर्वी नासा या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेने काही छायाचित्रे जारी केली होती. ही छायाचित्रे पाहून अशी शंका व्यक्त करण्यात आली होती की, चंद्रावर परग्रहवासी असण्याची शक्‍यता असून, ते पृथ्वीवर हल्ला करू शकतात. हा गैरसमजही असू शकतो; मात्र या कारणानेही चंद्र चर्चेत आला. यावर्षी चंद्रयान-2 ही भारताची मोहीम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मानवाला चंद्रावर पाठविण्याच्या तयारीला या मोहिमेद्वारे इस्रो गती देणार आहे. चंद्राची चर्चा यावर्षी होण्याचे हेही एक कारण आहे. परंतु आणखीही काही कारणे आहेत. जगभरातील तीन याने 2019 मध्ये चंद्राच्या दिशेने झेपावण्यास सज्ज आहेत. त्यामुळे यावर्षी या मोहिमांची चर्चा सतत होत राहील.

भारताच्या चंद्रयान-2 मोहिमेपूर्वी चीनचे चेंग-4 हे यान चंद्राच्या दिशेने रवाना होणार आहे. यंदाच्या मोहिमांमधील ही पहिली मोहीम असू शकते. चंद्रयान-2 हे अशा प्रकारचे दुसरे यान असेल. त्यापाठोपाठ इस्रायलचे स्पॅरो हे यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. याखेरीज 2019 च्या अखेरीस किंवा 2020 च्या प्रारंभी नासाचे यानही चंद्रावर उतरणार आहे. जपानने स्पेस-एक्‍स संस्थेच्या माध्यमातून चंद्रावर उतरण्याची तयारी चालविली असून, ही मोहीम 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. परंतु तत्पूर्वी म्हणजे या वर्षाच्या अखेरीस चंद्रावरील मोहिमेसंदर्भात जपानकडून काही महत्त्वाची माहिती जारी केली जाण्याची शक्‍यता आहे.

ऍस्ट्रोबेटिक्‍स या अमेरिकेतील खासगी स्पेस रोबोटिक्‍स कंपनीने चंद्रावरील माणसाच्या स्वारीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चांद्रयान-2 प्रमाणेच फेब्रुवारी 2019 मध्ये चंद्रावर पोहोचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. याच वर्षी चंद्रावरील मातीवर लेजर किरणांचा वापर करून काही प्रयोग करण्याचे निश्‍चित झाले आहे. लेजरच्या साह्याने चंद्रावरील खडक फोडण्याचा प्रयत्न केला जाणार असून, वितळलेल्या खडकांना थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या साह्याने आकार दिला जाणार आहे. चंद्रावर रोपे उगवून येतात का, हे पाहण्यासाठीही याच वर्षी प्रयोग केला जाणार आहे. चंद्राला पृथ्वीचा सर्वांत जवळचा “शेजारी’ हा दर्जा देण्याच्या निर्णयावरही गेल्या काही वर्षांत एकमत झाले आहे. या सर्व घटनांची चाहूल गेल्या वर्षीच लागली असली, तरी प्रत्यक्षात या योजनांचा कार्यारंभ याच वर्षी होणार आहे. तसेच अनेक मोहिमांना या वर्षभरात वेग मिळणार आहे.

चंद्रयान-2 यान प्रक्षेपित झाल्यानंतर 40 दिवसांनी ते चंद्रावर उतरेल. चंद्राच्या ज्या भागावर बर्फ असल्याचे चंद्रयान-1 ने केलेल्या संशोधनात आढळून आले होते, त्या भागात चंद्रयान -2 आणखी सखोल संशोधन करेल. चंद्राच्या या भागावर बर्फ असल्याच्या भारताच्या दाव्याला नासानेही पुष्टी दिली आहे. या सर्व बाबी वर्षभर आपले लक्ष चंद्राकडे वेधून घेणाऱ्या ठरणार आहेत. याच दरम्यान भारताकडून 2022 मध्ये हाती घेण्यात येणाऱ्या गगनयान मोहिमेसाठी तीन अंतराळवीरांची निवड केली जाईल. देशाच्या पहिल्या मानवी अंतरिक्ष मोहिमेत हे तिघे सहभागी होतील. त्यामुळे या कालावधीत सर्वांच्या नजरा चंद्राकडेच रोखलेल्या असतील. या वर्षभरात चंद्राविषयी हाती येणाऱ्या प्रत्येक माहितीचे इस्रोकडून विश्‍लेषण केले जाईल.

दुसरीकडे, ऍस्ट्रोबेटिक्‍स या खासगी कंपनीने नासाच्या एम्स रिसर्च सेंटरमध्ये तळ ठोकला आहे. 265 किलोपर्यंतचे वजन प्रतिकिलो 12 लाख डॉलर या दराने चंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ही कंपनी “लॅंडर’ विकसित करीत आहे. या लॅंडरचा वाहक 2020 पर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा आहे. या कंपनीचे 11 सहकारी आणि अंतरिक्ष शास्त्रज्ञ 2019 मध्ये कामात खूप व्यग्र असतील. जेफ बूजों यांची ओरिजिन आणि फ्लोरिडा येथील मून एक्‍स्प्रेस तसेच जपानमधील आय स्पेस ही स्टार्टअप कंपनीसुद्धा या दिशेने जोरदार तयारी करीत आहे. 4500 किलो वजन चंद्रावर पोहोचविण्याचे उद्दिष्ट जपानच्या कंपनीने बाळगले आहे.

स्पेस एक्‍स या कंपनीने तर चंद्रावर जाणाऱ्या पहिल्या पर्यटकाचेही नाव जाहीर केले आहे. चंद्रावर पर्यटन सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यानुसार योसाकू मेजावा हे जपानचे नागरिक चंद्रावर जाणारे पहिले पर्यटक ठरतील. त्यामुळे या वर्षाच्या कालावधीत स्पेस एक्‍सकडून या मोहिमेसंदर्भात काय तयारी केली जाते, याकडेही जगाचे लक्ष असेल. याखेरीज गूगल ल्यूनर एक्‍स पुरस्कारासाठी एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. जी खासगी कंपनी सर्वांत आधी चंद्रावर आपले रोव्हर पोहोचवेल, त्या कंपनीला विजेता घोषित केले जाणार असून, त्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. इस्रायलमधील कंपन्या अमेरिकेच्या सहकार्याने या शर्यतीत आघाडीवर आहेत. ही स्पर्धा जिंकण्यासाठी कोणती कंपनी काय प्रयत्न करते, याकडेही यावर्षी जगाचे लक्ष असेल.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या तज्ज्ञांनी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीपासून विटा बनविल्या आहेत. चंद्रावर वस्ती तयार करता येईल का, या दिशेने हे पहिले पाऊल मानायला हवे. चंद्रावर रहिवासी वस्ती बनविण्याबरोबरच रस्ते आणि लॉंच पॅड बनविण्यासाठी या विटांचा वापर होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चंद्रावरील मातीत 40 टक्‍क्‍यांच्या आसपास ऑक्‍सिजन आहेच; शिवाय चंद्रावर बर्फही असून, त्यातही ऑक्‍सिजन असणारच. हा ऑक्‍सिजन विलग करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून चंद्रावर दीर्घकाळ वास्तव्य करण्याची संकल्पना साकार होऊ शकेल. यासाठी विकसित केल्या जात असलेल्या तंत्रज्ञानाचे यशही याच वर्षी पाहायला मिळण्याची दाट शक्‍यता आहे. एकंदरीत, यावर्षी विविध कारणांनी चंद्राकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)