विशेष : मरावे परी…

स्वप्निल वाघ

अवयवदान ही संकल्पनाच किती छान आहे की, तुमच्या मृत्यूनंतरसुद्धा तुम्ही या जगात असाल आणि तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचलेला असेल.

वैद्यकीय क्षेत्राने भारतात बरीच प्रगती केली. किंबहुना भारत हा जागतिक पातळीवरील मेडिकल टुरिझमसाठीही ओळखला जाऊ लागला आहे. अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळजवळ 95 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. पूर्वी रक्‍तदान करण्यासाठी, समाज सहजासहजी पुढे येत नव्हता; परंतु आज तशी परिस्थिती नाही. जनजागृती, उपक्रमे, शिबिरे आयोजित करून आपण रक्‍तदान मोहीम फत्ते केली आहे.

त्यामुळे रक्‍ताचा तुटवडा क्‍वचितच कधीतरी भासतो; पण त्याहूनही गंभीर बाब आहे ती म्हणजे अवयवदान. त्यामुळे आता वेळ आली आहे आपणहून पुढे येऊन अवयवदान करण्याची तसेच अवयवदान जनजागृतीची!

अवयवदान ही अशी प्रक्रिया आहे ज्यात व्यक्‍ती स्वतःचे अवयव इतर दुसऱ्या गरजू व्यक्‍तीला प्रत्यारोपण करण्यास संमती देते. शक्‍यतो जिवंतपणी अवयवदानासाठी संमती दिली जाते परंतु व्यक्‍ती जर अचानक मृत्युमुखी पडली तर तिचे वारस अवयवदानासाठी परवानगी देऊ शकतात. एखादी व्यक्‍ती मृत पावते किंवा त्या व्यक्‍तीचा मेंदू मृत होतो (ब्रेन डेड) तेव्हा त्या व्यक्‍तीच्या शरीरातील किडनी, डोळे, हृदय, यकृत, फुफ्फुसे, त्वचा, स्वादुपिंड हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे काढून दुसऱ्या व्यक्‍तीला वेळेत प्रत्यारोपण करता येते. गरजू रुग्णांना ज्या अवयवांची गरज असते त्या रुग्णांमध्ये दात्याच्या अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते त्यामुळे मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांना जीवदान मिळते. हे जीवनदान मिळण्याचे श्रेय फक्‍त दात्यालाच असते.

“दान’ संकल्पनेला धर्मातही विशेष महत्त्व आहे. श्रीगणेशाच्या कथेत बालगणेश आणि त्यांना लावलेले हत्तीचे मस्तिष्क हे एक अवयवदानाचे सुंदर उदाहरण आहे. मस्तिष्क दान करून जणू हत्तीला दैवत्व प्राप्त झाले. कोणताही धर्म एखाद्याचा जीव वाचवणे, जीवनदान देणे यासाठी सदैव तत्पर असतो म्हणून समाजाने धार्मिक आधारावरील संकुचित मनोवृत्ती न बाळगता अवयव दानासाठी पुढारलेपणा घेतला पाहिजे, कारण गरजू रुग्णांना तुमची गरज आहे आणि मदत हीच मानव धर्माची शिकवण!

अवयव दान कोण करू शकतो?

या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्याआधी आपण मृत्यूचे प्रकार समजूया, साधारणपणे नैसर्गिक मृत्यूत अवयवदान करणे थोडे सोपे असते. हृदयविकारामुळे होणारा मृत्यू – या प्रकारात हृदयामुळे होणारी रक्‍ताभिसरणाची प्रक्रिया ठप्प होते आणि अवयवांना मागणीच्या तुलनेत ऑक्‍सिजन कमी मिळतो. परिणाम स्वरूप अवयवांचे कार्य घडवून आणणाऱ्या पेशी मृत होतात आणि हे अवयव निकामी होतात.

मस्तिष्क स्तंभ मृत्यू – जेव्हा काही कारणांमुळे (मेंदूला झालेली इजा इत्यादी) मस्तिष्क स्तंभ कार्य करणे बंद झाले आणि जर हृदयाचे कार्य नियमित घडत असेल तर अशा परिस्थितीत अवयवांना नियमित रक्‍तपुरवठा होत असतो त्यांची ऑक्‍सिजनची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण होत नाही

पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या मृत्यूत मृत व्यक्‍ती अवयव दान करू शकत नाही, परंतु शरीरातील एक महत्त्वाचा घटक दान करता येतो आणि तो म्हणजे त्वचा. जळीत रुग्णांना ही त्वचा कामी येते आणि त्यांचा जीव वाचवता येतो. दुसऱ्या प्रकारात जवळ जवळ सर्वच अवयव दान करू शकतो. ज्यांना मधुमेह, रक्‍तदाब, क्षयरोग, चष्मा वापरणारे रुग्णसुद्धा अवयवदान करू शकतात.
अवयव दान कोण करू शकत नाही

ज्या व्यक्‍ती हेपॅटायटीस बी, एचआयव्ही, रेबीज, कर्करोग या रोगांनी ग्रासलेले आहेत किंवा ज्यांचा मृत्यू हा पाण्यात बुडाल्यामुळे झाला आहे अशा व्यक्‍तींचे अवयव दान करण्यायोग्य नसतात. जिवंतपणी जर एखाद्याला अवयव दान करायचे असल्यास अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे.

अवयवदान, जग आणि भारत

जगभरात स्पेनमध्ये सर्वात जास्त अवयव दाते आहेत, असे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. जगाच्या पाठीवर 2 कोटी लोकसंख्या असलेला श्रीलंका हा देश नेत्रदानाच्या बाबतीत एक वेगळीच भूमिका बजावताना दिसतो. नेत्रदान प्रक्रियेत डोळ्याचा कॉर्निया हा भाग काढला जातो आणि आश्‍चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे श्रीलंका जगाला कॉर्निया निर्यात करतो. केवळ 2 कोटी लोकसंख्या असलेला श्रीलंका नेत्रदान करून जगाला दृष्टी देत असताना वैश्‍विक गुरू असलेला भारत अवयवदानाच्या बाबतीत मागे का राहिला? भारतात सर्वात जास्त अवयवदान हे तमिळनाडूत होत आहे, या कार्याची नोंद म्हणून राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

अवयवदान व अवयवचोरी

अवयवचोरी हा शब्द आपल्याला नवीन वाटेल; पण भारतात ही प्रक्रिया काही नवीन नाही. भिकारी, अनाथ मुले, ज्येष्ठ अशिक्षित व्यक्‍ती, अगदी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना पैशाचं आमिष दाखवून त्यांचे अवयव काढून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यात अवयव तस्करांचा फार मोठा वाटा आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, प्रत्यारोपण सुरक्षित आणि योग्य पद्धतीने व्हावे, अवयवांची व्यावसायिक विक्री थांबावी यासाठी केंद्र शासनाने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 लागू केला. हा कायदा अंमलात आल्यानंतर जवळजवळ 12 हजार किडनी, पाचशेपेक्षा जास्त यकृत, 25 हृदय आणि शेकडो डोळ्यांचे प्रत्यारोपण झाले आहे.
अवयवदान कसे केले जाते?

अधिकृत नोंदणी केल्यानंतर नोंदणी धारकांनी नोंदणीबाबतची माहिती कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांना द्यावी. मृत्यूनंतर शासकीय रुग्णालय किंवा दान केलेले अवयव स्वीकारणाऱ्या अधिकृत रुग्णालयाशी संपर्क साधावा तसेच मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू करावी. रुग्णालयातील कर्मचारी मृतदेह घेऊन जातात आणि अवयव काढून घेतल्यानंतर हा मृतदेह कुटुंबाला सुपूर्द करतात. 

या प्रक्रियेत मृतदेहाची विरुपता होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या पद्धतीने जतन केले जातात, जसे नेत्रदानाच्या बाबतीत आपण मृतदेहाची विशेष काळजी घेणं अपेक्षित असते. पंखा बंद करून मृतदेह वातानुकूलित खोलीत ठेवावा लागतो जेणेकरून कॉर्नियाचा ओलावा तसाच राहील. कॉर्निया सुकू नयेत म्हणून आय ड्रॉप्सचा वापर करतात. मृतदेह झोपवताना, मान ही उशीच्या सहायाने उंचावून ठेवलेली असते.

प्रत्यारोपण

जिथे अवयवाची मागणी आहे तिथे दान केलेल्या अवयवाला वेळेत घेऊन जाणे हे फार महत्त्वाचे असते. ही प्रक्रिया कमीत कमी कालावधीत प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडोर स्थापन केले जाते. ग्रीन कॉरिडोर हा एक असा मार्ग आहे ज्यामध्ये अवयव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेच्या प्रवासात बाधा निर्माण होऊ नये व कमीत कमी वेळेत प्राप्तकर्तापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले व्यवस्थापन होय.

दात्याच्या अवयवाचे प्रत्यारोपण हे शस्त्रक्रियेद्वारे केले जाते आणि प्राप्तकर्त्याला जीवनदान प्राप्त होते. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी गोष्ट म्हणजे मागील महिन्यात मुंबईत हाताचे यशस्वी प्रत्यारोपण केले गेले. तसेच मध्य प्रदेश मधील एका तरुणावर 14 तास शस्त्रक्रिया करून हाताचे प्रत्यारोपण केले गेले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.