#विशेष : ट्रोलचा राक्षस (भाग -१)

ऍड. अतुल रेंदाळे 
सोशल मीडियावरील विविध व्यासपीठांवर सध्या ट्रोलिंगच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. मतांचा प्रतिवाद करणे ज्यांना जमत नाही, असे भ्याड लोक बनावट अकाउंट उघडून त्याद्वारे व्यक्तिगत टीकाटिप्पणी आणि चारित्र्यहननासारखे मार्ग स्वीकारत आहेत. याच कारणामुळे ट्विटरला बनावट अकाउंट्‌स शोधून ती बंद करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी लागली. परंतु एवढ्याने ही समस्या समूळ नष्ट होणार नाही. ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे.
ट्रोलिंग ही सोशल मीडियातील एक विकृती बनली असून, दिवसेंदिवस ती वाढताना दिसते. घरबसल्या कुणावरही, काहीही शेरेबाजी करायला मिळत असल्यामुळे आपल्या योग्यतेचाही विचार न करता कुणालाही डिवचण्याचे जे स्वातंत्र्य लोकांना मिळाले आहे, त्याचे रूपांतर स्वैराचारात झाले असून, या निरर्थक आणि बोचऱ्या टीकाटिप्पणीत कोट्यवधी लोक वेळ फुकट घालवीत आहेत. सोशल मीडिया साइट्‌सचा यात आर्थिक फायदा असल्यामुळे हा रोग समाजाला पोखरत चालला आहे. आदर्श तर दूरच; पण माणसाला माणूस म्हणून दिला जाणारा किमान आदरही लोप पावेल की काय, अशी भयानक स्थिती समाजात या ट्रोलिगमुळे निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या या ट्रोलिंगपासून जगाला वाचविण्यासाठी ट्विटरने मे आणि जून 2018 मध्ये सात कोटी ट्विटर अकाउंट्‌स बंद केली. या अकाउंट्‌सवरून ट्रोलिंग होत असल्याचे तसेच अफवा पसरविल्या जात असल्याचे मानले जात होते. यासंदर्भातील आकडेवारी थक्क करणारी आहे. ऑक्‍टोबर 2017 च्या तुलनेत बनावट ट्विटर अकाउंट्‌स बंद करण्याचे प्रमाण आता दुप्पट झाले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये एकेका दिवसात दहा-दहा लाख ट्विटर अकाउंट्‌स बंद करण्यात आले आहेत. एवढे होऊनसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्तींना त्रास देण्याची, धमकावण्याची, त्यांच्याविषयी अनुद्‌गार काढण्याची आणि त्यांचा अवमान करण्याची प्रवृत्ती कमी होताना दिसत नाही.
काही दिवसांपूर्वीच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्रोल करण्यात आले होते. कॉंग्रेस नेत्या आणि प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांच्या कन्येला बनावट ट्विटर अकाउंटवरून धमकावण्यात आले होते. ही विकृती वाढतच चालली असून, ती आटोक्‍यात आणणे अनेक कारणांनी अवघड बनले आहे. कोण, कधी आणि कुणाला ट्रोल करू शकेल याचा अंदाज लावणे अवघड असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ट्विटरचे कोट्यवधी खातेधारक. केवळ आपल्या देशातच ट्विटरचे 3.04 कोटी यूजर्स आहेत. 2019 पर्यंत ही संख्या 3.44 कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. याखेरीज फेसबुक आहे, व्हॉट्‌सऍप आहे, स्नॅपचॅट आहे, टिंडर आहे…. असे अनेक मंच म्हणजेच सोशल मीडियातील प्लॅटफॉर्म लोकांना आपल्या मनातली खदखद बाहेर काढण्यासाठी उपलब्ध आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली एकमेकांना शिवीगाळही करता येते, धमकावता येते, अशी यातील असंख्य लोकांची धारणा बनली आहे. एखाद्याच्या बाबतीत नकारात्मक प्रचार करून त्याच्या व्यक्तिमत्त्वाची हानी करण्यासाठी ही माध्यमे लोकांना साह्यभूत ठरत आहेत. या साऱ्याचा परिणाम व्यावसायिक जगतावरही होतो. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या समर्थकांमधील कलगी-तुऱ्यामुळे धोरणात्मक वाटचालीवर प्रतिकूल परिणाम होतो. हा कलगी-तुरा अक्षरशः प्रायोजित रीतीने, पूर्वनियोजित आणि पद्धतशीरपणे सुरू असतो. राजकारणावर झालेला ट्रोलिंगचा दुष्परिणाम आता विकोपाला जाऊ पाहत आहे.
या गोष्टी फक्त भारतातच घडत आहेत, असे समजण्याचे कारण नाही. चीनमध्ये गेल्या वर्षी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. तेथे सोशल मीडियावर संघटीतरित्या सरकारी धोरणांच्या बाजूने 44 कोटी पोस्ट टाकण्यात आल्या होत्या, असे उघड झाले आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने सोशल मीडिया उपयुक्तच आहे, कारण लोक आपल्या हक्काच्या गोष्टी खुलेपणाने एखाद्या व्यासपीठावर मांडू शकतात, ही सकारात्मक बाजूच म्हणावी लागेल. लोक सरकारी धोरणांची चिकित्साही उघडपणे करू शकतात आणि सरकार तसेच सरकारमधील प्रतिनिधींच्या उत्तरदायित्वाविषयी प्रश्‍नही उपस्थित करू शकतात. परंतु या सकारात्मक चर्चेला सोशल मीडियाच्या अनेक व्यासपीठांवर ट्रोलिंगचे गालबोट लागले असून, हा रोग झपाट्याने समाजाला कुरतडत चालला आहे. या आजाराचा दुष्परिणाम आज जवळजवळ प्रत्येक व्यक्तीवर कमी-अधिक प्रमाणात झाल्याचे दिसते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)