#विशेष : ट्रोलचा राक्षस (भाग -२)

 ऍड. अतुल रेंदाळे 
सोशल मीडियावरील विविध व्यासपीठांवर सध्या ट्रोलिंगच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. मतांचा प्रतिवाद करणे ज्यांना जमत नाही, असे भ्याड लोक बनावट अकाउंट उघडून त्याद्वारे व्यक्तिगत टीकाटिप्पणी आणि चारित्र्यहननासारखे मार्ग स्वीकारत आहेत. याच कारणामुळे ट्विटरला बनावट अकाउंट्‌स शोधून ती बंद करण्याची विशेष मोहीम हाती घ्यावी लागली. परंतु एवढ्याने ही समस्या समूळ नष्ट होणार नाही. ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे.
ट्रोलिंगचा हा राक्षस कसा वाढीस लागला, हे पाहण्यापूर्वी “ट्रोल’ म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय, हे जाणून घ्यायला हवे. स्कॅन्डिनेव्हिया भागातील देशांमध्ये एक पौराणिक कथा प्रचलित आहे. या कथेत उग्र, कुरूप आणि राक्षसी वृत्तीच्या भयानक प्राण्याचे नाव “ट्रोल’ असे आहे. लोकांच्या यात्रेत विघ्न आणण्याचे काम हा जीव करतो. लोकांची यात्रा पूर्ण होऊ देत नाही. तशाच प्रकारे ट्रोलचा राक्षस व्हर्च्युअल मीडियाच्या यात्रेत अडथळे आणून त्याचा मूळ हेतू सफल होऊ देत नाही. ट्रोलिंग हा शब्द कुणीही स्पष्टपणे परिभाषित केलेला नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, अत्यंत हीन पातळीवरची आणि आक्रमक भाषा वापरून एखाद्याला मानसिक पातळीवर हैराण करणे म्हणजे ट्रोलिंग होय. या प्रांतातली सर्वांत मुख्य अडचण अशी की, ज्यांची ओळखच पटू शकत नाही, म्हणजे ज्यांचे सोशल मीडियावरील अकाउंट्‌सच बनावट आहेत, असे लोक ट्रोलिंग करीत असतील, तर त्यातून मार्ग कसा काय काढायचा? सन 2016 मध्ये ट्विटरने असे सांगितले होते की, त्या वेळेपर्यंत अवघ्या 0.061 टक्के म्हणजे केवळ 1.9 लाख अकाउंट्‌सचीच शहानिशा करण्यात आली होती. आता ही संख्या दुप्पट असेल, असे जरी गृहित धरले तरी कोट्यवधी अकाउंट्‌स असलेल्या ट्विटरवर विष ओकणारे किती अकाउंट्‌स बनावट असतील, याची कल्पनाही करता येत नाही. सरकारने मनात आणले तर ट्विटरवरून केल्या जाणाऱ्या अभद्र शेरेबाजीला काही प्रमाणात का होईना, लगाम घालता येणे शक्‍य आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्येच भाजप नेते के. एन. गोविंदाचार्य यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने ट्रोलिंगची समस्या संपविण्यासाठी अनेक आदेश दिले होते, याचे स्मरण अनेकांना असेलच. अशाच अन्य एका प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, री-ट्विटच्या बाबतीतही जबाबदारी निश्‍चित करण्याची गरज आहे.
अर्थात ट्रोलर्सना दुर्लक्षित करणे हाच सर्वोत्तम पर्याय असू शकतो. प्यू रिसर्च सेंटर या प्रतिष्ठेच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे निदर्शनास आले होते की, 60 टक्के लोक ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करूनच ऑनलाइन छळवादापासून स्वतःची सुटका करून घेतात. निनावी किंवा बनावट अकाउंट ओळखून त्यांच्याशी संवाद होऊच नये, याची काळजी घ्यायला हवी. निरर्थक संदेशांवर कमेन्ट देणे किंवा मतप्रदर्शन करणे टाळायला हवे. ज्या ऑनलाइन समुदायात खात्रीचे, विश्‍वासार्ह लोक आहेत, अशा समुदायांशीच स्वतःला जोडून घेणे चांगले. ट्रोलर्सना हास्यास्पद प्रत्युत्तर देणे, हाही चांगला मार्ग ठरू शकतो. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हेच केले. ट्रोलर्सनी केलेल्या मागणीवर उत्तर म्हणून त्यांनी लिहिले, “”ठीक आहे. मी तुम्हाला ब्लॉक केले आहे.” एक लक्षात घेतले पाहिजे, की सोशल मीडियावर जशा ट्रोलर्सच्या टोळ्या आहेत, त्याचप्रमाणे गंभीर चर्चा करणारे समुदायही आहेत. जर कमेन्ट करताना समजूतदारपणा दाखविला, तर असे चांगले समूहच ट्रोलर्सना योग्य प्रत्युत्तर ठरतील.
ट्विटरने बनावट अकाउंट्‌स बंद करण्याची मोहीम उघडली, हे चांगलेच केले आहे. परंतु त्यामुळे हा प्रश्‍न संपेल असे नाही. बनावट अकाउंट उघडताच येणार नाही, अशी व्यवस्था करणे हाच यावरील उपाय असून, त्या दृष्टीने तंत्रज्ञान उपलब्ध आहे का, हे पाहायला हवे. सोशल मीडियाने मुक्तपणे मते मांडायला सामान्यातल्या सामान्य माणसाला संधी आणि व्यासपीठ दिले. मात्र, त्याचा दुरुपयोगच अधिक प्रमाणात होताना दिसतो. सातत्याने होत असलेल्या शेरेबाजीतून सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाते, हा अनुभव आपण गेली काही वर्षे पाहतो आहोत. अभद्र भाषेत टीकाटिप्पणी करणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य नव्हे, हे नीट ध्यानात घ्यायला हवे. त्यातल्या त्यात बनावट अकाउंट उघडून शेरेबाजी करणारी मंडळी तर “भ्याड’ याच प्रवर्गात मोडतात. एखाद्या मताचा खुलेपणाने प्रतिवाद करण्याचे धाडस त्यांच्यात नसते. त्यामुळे व्यक्तिगत टीकाटिप्पणी, चारित्र्यहनन अशा मार्गांचा अवलंब केला जातो. समाजस्वास्थ्य बिघडविणाऱ्या या घटकांना विविध मार्गांनी चोख प्रत्युत्तर देऊन ही प्रवृत्ती लवकरात लवकर मोडून काढायला हवी. चांगल्या लोकांचे संघटन झाले की वाईट प्रवृत्ती नामोहरम होतात, हा इतिहास आहे. ट्रोलर्सच्या बाबतीत हेच करायला हवे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)