विवेकची नसती उठाठेव अंगाशी आली

विवेक ओबेरॉय एकतर बऱ्याच वर्षांनी “पीएम नरेंद्र मोदी’च्या निमित्ताने बिग स्क्रीनवर दिसणार आहे. पण गप गुमान प्रमोशन करून शांतपणे सिनेमाचे यश एन्जॉय करण्याची अक्कल त्याला सुचली नाही. “एक्‍झिट पोल’च्या निमित्ताने वादग्रस्त मीम पोस्ट करून त्याने बॉलिवूडसह सगळ्या सेलिब्रिटी वर्ल्डचा रोष ओढवून घेतला.

दोन दिवस या सगळ्या प्रकरणावरून त्याला सगळ्यांनी भरपूर ऐकवले. सोशल मीडियावर ट्रोल केले. महिला आयोगाने नोटीसही बजावली. एवढे सगळे झाल्यावर त्याच्या स्टार व्हॅल्यूलाच धोका निर्माण झाला. याचा वादंगाचा फटका “पीएम नरेंद्र मोदी’ला बसू नये, म्हणून त्याने माफी मागून विषय मिटवायचा प्रयत्न केला खरा पण ही नसती उठाठेव त्याच्या चांगलीच अंगाशी आली.

स्माईल फाउंडेशन नावाच्या एका चॅरिटेबल ऑर्गनायजेशनने त्याला आपल्या उपक्रमातूनच डच्च्यू देऊन टाकला आहे. फणी चक्रिवादळ पीडितांसाठी निधी संकलन करायला त्याला एका कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते. ही संघटना महिला सशक्‍तीकरणासाठी कार्यरत आहे. विवेकची वादग्रस्त पोस्ट या ऑर्गनायजेशनच्या मुख्य उद्देशालाच छेद देणारी असल्याने त्याला या उपक्रमातून बाहेर काढले गेले आहे.

विवेकने ट्‌विटरवर केलेल्या पोस्टमध्ये “एक्‍झिट पोल’वरून खिल्ली उडवली होती. ऐश्‍वर्याला पहिल्यांदा सलमानबरोबर दाखवून “ओपिनियन पोल’, नंतर स्वतःबरोबर दाखवून “एक्‍झिट पोल” आणि शेवटी अभिषेक बरोबर दाखवून “रिझल्ट’ अशी तुलना त्याने केली. थोडक्‍यात ऐश्‍वर्याच्या तिन्ही अफेअर आणि मॅरेज लाईफला एकाच मीममध्ये आणून त्याने तिला बदनाम केले. अमिताभ बच्चन यांनीही त्याला विचार करून मत मांडण्याचा सल्ला दिला. पण या सगळ्या उठाठेवीत त्याला धडा मिळाला आहे की नाही, माहित नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.