विविधा: स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी

माधव विद्वांस

भक्‍तिगीत, अभंग, भैरवी यातून आपल्या हृदयातून आवाज देणारे शास्त्रीय गायक “स्वरभास्कर’ पंडित भीमसेन जोशी यांचे आज पुण्यस्मरण (24 जानेवारी 2011). त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922, रोजी गदग जिल्ह्यातील रोन (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी इंग्लिश-कानडी शब्दकोश तयार केला होता. भीमसेन जोशीं यांचे वडिलांना त्यांनी इंजिनियर किंवा डॉक्‍टर व्हावे असे वाटायचे. पण भीमसेन यांचा संगीताकडे ओढा होता.हे वडिलांना पसंत नव्हते. भीमसेन लहान वयातच हार्मोनियम व तानपुरा शिकले होते. त्यांनी धारवाडजवळील कुंदगोळ येथे सवाई गंधर्वांचे संगीत ऐकले तसेच अब्दुल करीमखां यांच्या ठुमरीने ते प्रभावीत झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखेर भीमसेन वयाच्या 11 व्या वर्षीच घरातून बाहेर पडले व संगीतभूमी ग्वाल्हेर गाठले. त्यावेळी भीमसेन जोशींचे खिशात पैसे नव्हते खायची भ्रांत होती. ते धारवाडहून निघाले वाटेत सहप्रवाशांकडून पैसे गोळा करून त्यांनी पुणे गाठले. तेथून त्यांची गुरुसाठी भटकंती सुरू झाली. उस्ताद अब्दुल करीम खॉं, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खॉं, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खॉं यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे आले त्यांची भटकंती चालू असताना त्याचे वडील त्यांना शोधत होते. त्यांना त्यांच्या या संगीतवेड्या मुलाची जालंदर येथे गाठ पडली.

भीमसेन घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांना घेऊन जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील सवाई गंधर्व (रामभाऊ कुंदगोळकर) यांच्याकडे घेऊन गेले त्यांची संगीताची ओढ पाहून रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसेन यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. सवाई गंधर्व हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील गुरुकुल परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्ट करून गायनाचे धडे घेतले. वर्ष 1936 ते 1941 या पाच वर्षांच्या कालावधीत शक्‍य तेवढे संगीत आत्मसात करून गुरुआज्ञेने त्यांचा निरोप घेतला व पुणे येथे आले.

वर्ष 1942 मधे त्यांची पहिली संगीत मैफल पुण्यातील हिराबागेत झाली. वर्ष 1943 मधे त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. सवाई गंधर्वांच्या षष्ट्‌यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. भीमसेन जोशी यांचे गायन ऐकणे म्हणजे भक्तिरसात न्हाऊन निघण्यासारखे होते. त्यांचे आलाप काळजाचे ठाव घेणारे होते. राम फाटक यांनी संगीत दिलेली त्यांचे गाजलेले अभंग “अगा वैकुंठीच्या राया,’ “आता कोठे धावे मन,’ “तुका आकाशाएवढा,’ “ज्ञानियांचा राजा,’ “इंद्रायणी काठी,’ “काया ही पंढरी,’ “मन रामरंगी रंगले,’ “माझे माहेर पंढरी,’ “रूप पाहता लोचनी,’ “तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ “इंद्रायणी काठी’ ही गीते अजरामर झाली. त्यांना 2009 मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)