#विविधा: सरस्वती ग्रंथ संग्रहालय तंजावर   

माधव विद्वांस 
आज 27 सप्टेंबर म्हणजे राष्ट्रीय ग्रंथालय दिन. त्यानिमित्त तंजावरच्या सरफोजी भोसले सरस्वती संग्रहालयाची माहिती करून घेऊ. या ग्रंथालयांची सुरुवात 16 व्या शतकात तंजावरच्या नायक राजांनी केली. सन 1675 मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरचा ताबा घेतला व या ग्रंथालयाला उर्जितावस्था दिली. या ग्रंथालयात संस्कृत, तमिळ, मराठी व तेलुगू या भाषांतील अनेक विषयांवरील ग्रंथ असून, त्यामध्ये ज्योतिष, आयुर्वेद, अभियांत्रिकी आदी विषयांचा समावेश आहे. दुर्मीळ असे, पर्णपत्रावरील जीर्ण झालेले सात ते आठ हजार ग्रंथही येथे जतन करून ठेवण्यात आले आहेत. येथे सुमारे 50,000 जुने दुर्मिळ संदर्भ सांगणारे लेख आहेत यात 30 हजार पुस्तके आहेत. त्यात जुने संस्कृत ग्रंथ, ताम्रपट, पर्णपत्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आहेत.
आयुर्वेदासंबंधी माहिती देणारे ग्रंथ तामिळ व संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी, संशोधक संशोधनासाठी येथे येतात व त्यांना सहकार्य केले जाते. यात 80% ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात लिहिलेले संस्कृत ग्रंथ आहेत. अत्यंत दुर्मिळ असे माहितीचे संकलन येथे आहे. महाराज सरफोजी भोसले अत्यंत अभ्यासू व संशोधकवृत्तीचे होते. त्यांनी एक जर्मन धर्मगुरूंकडून फ्रेंच, इटालियन भाषेचा अभ्यास केला होता. ते संस्कृत उत्तम जाणत असत. अनेक विद्वान पंडितांकडून अनेक ठिकाणाहून चांगले ग्रंथ आणविले. तसेच 17 व्या व 18व्या शतकातील 30078 हस्तलिखिते येथे आहेत. छ. शिवाजी महाराज यांच्यावर परमानंदकृत “शिवभारत’या दुर्मीळ ग्रंथाची मूळ प्रत येथे सापडते. हा ग्रंथ शिवचरित्राचा आधार मानला जातो. शिवचरित्र लिहिताना सन 1920 च्या सुमारास शिवचरित्राचे लेखक दिवेकर यांना या ग्रंथाबाबत पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातील “आनंदाश्रम’ येथे पुसटशी माहिती मिळाली होती. पण ग्रंथ मिळेना. त्यावेळी त्यांनी तंजावर येथेही चौकशी केली होती. पण त्यावेळी प्रतिसाद मिळाला नाही.
त्या वेळी हा ग्रंथ तंजावर येथील ग्रंथालयात असल्याची माहिती त्यांना लिपझिग येथील जर्मन ओरिएन्टल सोसायटी या पौर्वात्य ग्रंथ ठेवणाऱ्या संस्थेने दिली. तसेच तेथील नोंदीचा क्रमांकही कळविला. यावरून या ग्रंथालयाची माहिती पाश्‍चिमात्य राष्ट्रांतील विद्वानांना होती, हे दिसून येते. या ग्रंथालयाचे संगणीकरण करण्यात येत असून ते अद्ययावत करण्यात आले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)