#विविधा: संगीत खुर्ची   

अश्‍विनी महामुनी 
आमच्या कॉलनीचा गणपती म्हणजे खराच आनंदोत्सव आहे. छोटासा मांडव असतो. मध्यम आकाराची सुबक मूर्ती असते. दिव्यांचा-रोषणाईचा फार झगमगाट नसतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डीजेचा धिंगाणा नसतो. सकाळ-संध्याकाळ छानशी भक्‍तिगीते लावलेली असतात. हळुवार, कानाला त्रास होणार नाही अशा आवाजात. आणि रात्रीच्या आरतीनंतर वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यावेळी कॉलनीतील बहुतेक सर्वजण घरी आलेले असतात, मुलेही होमवर्क करून मोकळी झालेली असतात. मग संध्याकाळी उशिराच्या आरतीनंतर तास दोन तास विविध कार्यक्रम चालतात. त्यापूर्वी आरतीनंतर सर्वांना छानसा आणि भरपूर-रोज वेगळा प्रसाद मिळतो. उगाच डेकोरेशनसाठी खर्च करण्यापेक्षा प्रसादासाठी खर्च केलेला चांगला, असे आमचे सेक्रेटरी सांगतात. ते सर्वांना पटते.
कॉलनीचा गणपतीचा मंडप आमच्या दारासमोरच आहे. म्हणजे आमच्या टेरेसमध्ये उभे राहिले की गणपतीचे दर्शन होते. सकाळी सकाळी देवाचे दर्शन घेतले की फार बरे वाटते. रोजची आरती घरात ऐकायला येते. रात्रीच्या वेळी होणारे कार्यक्रम आम्ही टेरेसमध्ये बसून बघू शकतो. कार्यक्रम म्हणजे काय, स्टेजवर होणारी मुलांची नाचगाणी, एकांकिका आदी करमणुकीचे कार्यक्रम आणि समोरच्या मोकळ्या जागेत होणारे काही फनी गेम्स. त्यात लिंबूचमचा शर्यत आणि संगीत खुर्ची हे जास्त आवडते खेळ. संगीत खुर्ची हा तर जास्तच आवडता. सोपा, गमतीदार आणि खूप वेळ चालणारा. त्यात कितीही खेळाडू चालून जातात. फक्‍त जागा पाहिजे आणि खुर्च्या पाहिजेत. मग झाले.
लहान मुलांची संगीत खुर्ची चालते तेव्हा मोठी मजा येते. शाळकरी म्हणजे साधारण सहा ते अकरा-बारा या वयोगटाची अल्लड मुले-यात मुलीही आल्याच-मोठ्या उत्साहाने संगीत खुर्ची खेळतात. काही तरी संगीत लावलेले असते. ते चालू असेपर्यंत खुर्च्यांभोवती फिरायचे आणि संगीत बंद केले की मिळेल त्या खुर्चीत पटकन बसायचे. संगीत खुर्चीमध्ये खेळणाऱ्यांपेक्षा एक खुर्ची कमी असल्याने बसायला खुर्ची न मिळालेला एक खेळाडू आपोआप बाद होतो. आणि असे होत होत शेवटी जो एकटा राहतो, तो विजेता.
संगीत खुर्ची म्हटले की मला आमच्या शाळेच्या गॅदरिंगच्या वेळची संगीत खुर्ची आठवते. तेव्हा शिक्षकांची संगीत खुर्ची असायची. नेहमी गंभीर असणाऱ्या आमच्या सरांना आणि मॅडमना असे खुर्चीसाठी अशी प्रथमच पळापळ करताना पाहून मुले नुसती चेकाळून जायची. शाळेतील सर्व शिक्षक अशा वेळेसच बाहेर एकत्र आणि खेळकर मूडमध्ये पाहायला मिळायचे. आमचे डी. के. जोशी नावाने प्रिन्सिपॉलही त्यात भाग घ्यायचे आणि बाद झाले की हसत बाजूला व्हायचे.
पण गणपती उत्सवातील लहान मुलांची संगीत खुर्ची जास्तच गमतीदार असते. संगीत सुरू होण्यापूर्वी त्यांना सारे नियम सांगितलेले असतात. गाणे सुरू झाले की खुर्च्यांभोवती फिरायचे आणि ते बंद झाले की एका खुर्चीत बसायचे. संगीत सुरू झाले की पुन्हा फिरायला लागायचे. हा खेळ खेळणाऱ्या मुलांच्या चालण्याच्या तऱ्हाही वेगवेगळ्या आणि बघण्यासारख्या असतात. कोणी इकडे तिकडे न बघता धावत सुटतात, तर कोणी आरामात रमत गमत चालतात, काही जण खुर्चीवर लक्ष ठेवून आपला वेग कमी जास्त करतात. एका राऊंडला तर ओंकार (वय सात) आणि रुद्र (वय सहा) दोघेही एकाच खुर्चीत बसले. अगदी आरामात. गळ्यात हात टाकून. लहान असल्यामुळे ते दोघेही एकाच खुर्चीत आरामात बसू शकले. एकाला उठायला सांगितले तर तयार होईनात. मग त्यांच्यासाठी नियम बदलावा लागला. एका राऊंडला तर छोटी सुवर्णा इतक्‍या जोरात धावून खुर्चीत बसली, की त्या वेगाने खुर्ची आणि खुर्चीत बसलेली सुवर्णा, दोघेही खाली पडले. सगळे हसायला लागले. कोणीतरी जाऊन खुर्ची उचलली आणि तिला उठून बसवले. कपडे झटकून ती हसत हसत पुन्हा खेळायला तयार.
या खेळात एक बरे होते, भाग घेणाऱ्या प्रत्येकालाच बक्षीस ठेवलेले होते त्यामुळे हारजितीला तसे फारसे महत्त्व नव्हते. नंतर जोडप्यांसाठी संगीत खुर्ची होती. त्यात एकेका बाजूला एकाऐवजी दोन दोन खुर्च्या लावलेल्या. पतिपत्नीनी एकामागून एक धावायचे आणि जोडीनेच खुर्चीत बसायचे असा खेळ होता तो.
या संगीत खुर्च्या आनंददायी, करमणूक करणाऱ्या असतात. मात्र राजकारणातील संगीत खुर्च्या नको वाटतात. तो म्हणजे अगदी वाईट खेळ असतो. सारे नियम मोडून खेळला जाणारा. जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारा आणि जिंकलेल्याचे कौतुक न करणारा. त्यापेक्षा आपली मुलांची संगीत खुर्ची चांगली. किती तरी चांगली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)