#विविधा: संगीतकार दशरथ पुजारी 

माधव विद्वांस 
“केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा…’ असे सुंदर गीत संगीतबद्ध करणारे दशरथ पुजारी यांची आज जयंती. दशरथ पुजारी यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 रोजी बडोद्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत गिरगावातील युनियन हायस्कूलमध्ये झाले. त्यांची अनेक गीते आज आपल्या ओठावर आहेत. मोजकीच पण सुरेल गाणी त्यांनी संगीतबद्ध केली. भावगीते व भक्‍तिगीते हे त्यांचे जणू होमपीच होते. ते स्वतः गायक होते तसेच ते हार्मोनियमही उत्तम वाजवायचे.
दशरथ पुजारी यांचे वडील नोकरीनिमित्त बार्शीला आले.
तेथे गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकिर्दीस सुरुवात केली. ते कार्यक्रमातून गाणी गायचे. पण ते गायक म्हणून पुढे आले नाहीत. कचत कंपनीकडे त्यांनी त्यांच्या शास्त्रीय गाण्याच्या रेकॉर्डस रेकॉर्ड व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले होते. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ते बाहेर कार्यक्रम करू लागले त्याच वेळी कचत कंपनीतील जी. एन. जोशी यांनी त्यांचे गाणे ऐकले व त्यांना भावगीत गाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मात्र दशरथ पुजारी यांनी चाली लावण्याचा ध्यास घेतला कठोर परिश्रम घेतले व अनेक चाली तयार केल्या व अखेरीस कचत ने त्यांची दखल घेतली. त्यांनी संगीत दिलेले “हांस रे मधू हांस ना…’ हे नाना साठे यांचे प्रमोदिनी देसाई यांनी गायलेले गीत रेकॉर्ड झाले व संगीतकार म्हणून त्यांना मान्यता मिळाली.
संगीतकार म्हणून मान्यता पावल्यावर मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्‍वर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या दिग्गज गीतकारांच्या गाण्यांना चाली लावल्या. ‘रिमझिम झरती श्रावणधारा’, ‘अशीच अमुची आई असती’, ‘चल ऊठ रे मुकुंदा’, ‘केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ इत्यादी गाणी आजही लोकांचे ओठावर आहेत. त्यांनी माणिक वर्मा व सुमन कल्याणपूर यांना घेऊन संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. “हरी भजनाविण काळ घालवू नको रे’ या अभंगाला पुजारींनी अहिर भैरव रागातली चाल लावली व स्वतःच्या आवाजात हा सुंदर अभंग गायला व त्याचे रेकॉर्डिंगपण झाले. “गीतकृष्णायण’ व “गीतशिवायण’ यांचे अनेक जाहीर कार्यक्रम झाले. यशवंतराव चव्हाण यांनीही या कार्यक्रमांना हजेरी लावून त्यांचे कौतुक केले होते. अवीट गोडीची गीते संगीतबद्ध करणाऱ्या दशरथ पुजारींना मानाचा मुजरा.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)