#विविधा: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

माधव विद्वांस 
 
ग्रामीण कथा, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार, चित्रकार, शिकारी छंद जोपासणारे श्रेष्ठ मराठी कथाकार, व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचे आज पुण्यस्मरण. (जन्म 6 जुलै 1927, निधन – 28 ऑगस्ट 2001)त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. 
कथाकथनाच्या जाहीर कार्यक्रमांतून व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार, आणि शंकर पाटील यांनी महाराष्ट्र हसवून सोडला. (त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे भाग्यही प्रस्तुत लेखकाला लाभले) माडगूळकर अर्थात तात्या जास्त शिकलेले नव्हते. तथापि, साहित्यिक त्यांच्यात उपजत होताच. काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. थोरले बंधू गदिमा यांचे पावलावर पाऊल ठेऊन ते साहित्यात रमले. सन 1949 मधे “माणदेशी माणसे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. ग्रामीण भागाशी त्यांची असलेली नाळ या कथासंग्रहातून व्यक्‍त झाली.
अस्सल माणदेशी ग्रामीण जीवन त्यांनी रंगविले. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाची फारशी दाखल घेतली गेली नव्हती; पण त्यांच्या या कथांमुळे इरसाल ग्रामीणपणा शहरी लोकांना भावला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. “गावाकडच्या गोष्टी’ (1951), “हस्ताचा पाऊस’ (1953), “सीताराम एकनाथ’ (1951), “काळी आई’ (1954), “जांभळाचे दिवस’ (1957) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यामध्ये प्रामुख्याने तात्यांचे बालपण व ग्रामीण जीवन यावर प्रकाश पडतो. त्यांची “बनगरवाडी’ तुफान लोकप्रिय झाली. बनगरवाडीने अख्ख्या गावची व्यथा कथेद्वारे त्यांनी मांडली. कायम दुष्काळी भाग, तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, रानावनातील प्राणी त्यांच्या जीवनालाही स्पर्श लेखनातून त्यांनी केला होता. 
तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार बनगरवाडीने जिवंत केले. “बळी तो कान पिळी’ या म्हणींचे प्रत्यंतर त्यांनी आणून दिले. तात्यांना शिकारीचा नाद होता. त्यातील किस्सेही त्यांच्या लेखनात आले.आहेत. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता, ‘कोवळे दिवस’ ह्या कादंबरीत अशाच एका कोवळ्या स्वातंत्र्य सैनिकाचे अनुभव आहेत. “तू वेडा कुंभार’, “सती’, “पति गेले गं काठेवाडी,’ ही त्यांची नाटकेही गाजली. “पुढचं पाऊल’, “वंशाचा दिवा’, “जशास तसे’, “सांगत्ये ऐका’, “रंगपंचमी’ या त्यांच्या पटकथाही गाजल्या. त्यांच्या साहित्याचे इंग्रजी व डॅनिश भाषेतून भाषांतर झाले आहे. 
अशा हरहुन्नरी व्यक्‍तिमत्त्वास अभिवादन. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)