– माधव विद्वांस
भारतात क्रिकेटचा पाया घालणारे नवानगरचे राजे रणजितसिंह यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म जामनगर जवळच्या सरोदर या खेडेगावात 10 सप्टेंबर 1872 रोजी झाला. ‘नवानगर के जाम साहब’, ‘कुमार रणजितसिंहजी’, ‘रणजी’ आणि ‘स्मिथ’ या नावानेही ते ओळखले जात. राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षणास प्रारंभ केला. कॉलेजचे प्राचार्य क्रिकेटतज्ज्ञ चेस्टर मॅक्नॉटन यांच्या मार्गदर्शनाचा लाभ रणजींना झाला. त्यांनीच रणजींचे उपजत क्रीडागुण हेरले व क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले. लवकरच ते फलंदाजीत पारंगत झाले.
वर्ष 1888 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. सेंटफेथ शाळेत शिकत असताना मुख्याध्यापक गुडचाइल्ड यांनी त्यांचे गुण पारखून सर्वतोपरीने उत्तेजन दिले. हेवर्ड, रिचर्ड्सन, वॉट्स, लॉक्वुड अशा कसलेल्या फिरकी व जलदगती गोलंदाजांपुढे ते खेळले. पण वेगवान गोलंदाजाचा चेंडू अंगावर आला, की रणजीत गडबडून जात असत. हे पाहून त्यांच्या क्रिकेट प्रशिक्षकाने त्यांचा उजवा पाय खुंटीला बांधून ठेवला व तशा स्थितीत त्यांना वेगवान गोलंदाजी खेळायला लावली. परिणामी ते वेगवान गोलंदाजी निर्भयपणे खेळायला लागले.
1892 मध्ये ट्रिनिटी महाविद्यालयाच्या संघात त्यांची निवड झाली. 1894 मध्ये त्यांचा समावेश एमसीसी संघात झाला. केंब्रिज विद्यापीठाच्या संघात 1895 सालापासून रणजींचे क्रिकेटमधील कौशल्य प्रेक्षकांना दिसू लागले. त्याच वर्षी ससेक्स परगणा संघात त्यांचा अंतर्भाव झाला. भारतीय खेळाडू कौंटी क्रिकेट खेळण्याच्या योग्यतेचे नसतात, हा इंग्रजांचा समज रणजितनी आपल्या खेळाने चुकीचा ठरवला. पहिल्याच सामन्यात (1895) एमसीसी विरुद्ध शतक झळकावून त्यांनी लॉर्ड्सचे मैदान गाजवले. त्यानंतर त्यांच्या शतकी खेळीचा धुमधडाका सुरू झाला. हे सर्व घडत असताना ते खेळातच रमले आणि त्यामुळे पदवी परीक्षा पास होऊ शकले नाहीत.
रणजितसिंह वर्ष 1896 मध्ये पहिला कसोटी सामना खेळले. यावेळी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे इंग्लंडवरील डावाने पराभवाची नामुष्की टळली, मात्र ऑस्ट्रेलियाला 3 गडी राखून जिंकले. या सामन्यात त्यांनी पहिल्या सत्रात 62 धावा काढल्या; पण ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला फॉलोऑन दिला. दुसर्या सत्रात रणजितसिंह यांनी नाबाद 154 धावा काढल्या व प्रथम श्रेणीत आपले स्थान भक्कम केले.
त्यानंतरच्या 15 सामन्यांतील 26 सत्रामध्ये त्यांनी चारवेळा नाबाद राहून, 45 च्या सरासरीने 989 धावा काढल्या तसेच त्यांची 175 ही सर्वोच्च धावसंख्या होती. भारतात जन्मलेले व इंग्लंडतर्फे खेळणारे तेच पहिले भारतीय खेळाडू. भारतात मात्र ते प्रथम श्रेणी दर्जाचे क्रिकेट खेळले नाहीत. भारतातील राष्ट्रीय विजेतेपदाच्या क्रिकेट स्पर्धेला रणजित यांचे नाव देण्यात आलेले आहे. भारतात रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 1934 पासून ते आजतागायत सातत्याने चालू आहे.
11 मार्च 1907 रोजी ते नवानगरचे राजा झाले. त्यांनी भारतातील सर्व संस्थानिकांच्या संघाचे प्रमुख म्हणूनही काम केले. क्रिकेटची आवड निर्माण होण्यासाठी मैदाने केली तसेच संघ बनविण्यास उत्तेजन दिले. ते इंग्लंडमध्ये असताना त्यांचे एडिथ बोरिसोबरोबर प्रेमसंबंध होते पण त्यांचा विवाह झाला नाही. अखेरपर्यंत ते अविवाहितच राहिले. 2 एप्रिल 1933 रोजी जामनगर येथे त्यांचे निधन झाले.