#विविधा: मुस्लीम समाजसुधारक हमीद दलवाई 

माधव विद्वांस 
पुरोगामी विचारसरणीचे हमीद दलवाई यांची आज जयंती. त्यांचा जन्म मिरजोळी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे 29 सप्टेंबर 1932 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण चिपळूण येथे व उच्च शिक्षण मुंबईत झाले.त्यांनी मराठी-इंग्रजी भाषांतून लेखन केले. त्यांनी मराठीतून ललित लेखन केले. एक कादंबरीही लिहिली तसेच कथासंग्रही लिहिला.
मुस्लीम जातीयतेचे स्वरूप-कारणे व उपाय (1968) आणि इस्लामचे भारतीय चित्र (1982) ही त्यांनी वैचारिक पुस्तकेहि लिहिली. मुस्लीम पॉलिटिक्‍स इन सेक्‍युलर इंडिया (1970) हे त्यांचे इंग्रजी पुस्तक होय. शिक्षण न घेणे हे मुस्लीम समाजाच्या मागासलेपणाचे कारण असून त्यासाठी शिक्षणाचा प्रसार समाजामध्ये त्यांनी सुरू केला. समाजातील अंधश्रद्धा या समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीतील अडथळा आहे हे जाणून पुरोगामी विचारांचे मुस्लीम कार्यकर्त्यांची त्यांनी मोठी फळी “मुस्लीम सत्यशोधक मंडळ’ या संस्थेतून त्यांनी उभी केली दिनांक 22 मार्च 1970 रोजी पुणे येथे या संघटनेची स्थापना केली.
दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई यांची त्यांना साथ होतीच. त्यांच्या पश्‍चातही त्यांनी त्यांचे काम पुढे चालू ठेवले. मंडळाचे कार्य हे मुख्यतः तलाकपीडित मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्‍नांशी निगडीत असले, तरी समान नागरी कायदा, मुस्लिमांनी आपापल्या प्रादेशिक भाषांतून शिक्षण घेण्याचा आग्रह, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार या गोष्टींवरही त्यांनी भर दिला होता. मंडळाचे कार्यकर्ते शेख वजीर पटेल यांच्या पुढाकाराने अमरावतीस कुटुंबनियोजनाची शिबिरे आयोजित करून नसबंदीच्या सुमारे 5,000 शस्त्रक्रिया घडवून आणल्या.
आपापल्या प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून मुस्लिमांनी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता व तसा ठराव त्यांनी मुस्लीम शिक्षण परिषदेच्या कोल्हापूर अधिवेशनात सन 1973 मध्ये करून घेतला. सन 1975 मध्ये मंडळाचे सरचिटणीस सय्यदभाई यांच्या नेतृत्वाखाली जेहाद-ए-तलाक चळवळ सुरू करण्यात आली व तलाकपीडित महिलांना व त्यांच्या मुलांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली. सन 1976 मध्ये अमेरिकेत भरलेल्या “वर्ल्ड युनिटी कॉन्फरन्स’मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. “इंडियन सेक्‍युलर सोसायटी’चे संस्थापक सदस्य होते. आपल्या शवावर कोणतेही धार्मिक संस्कार करू नयेत आणि त्याचे दहन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणेच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. राष्ट्रीय बाण्याच्या या समाजसुधारकास अभिवादन
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)