– माधव विद्वांस
सप्तरंगी व्यक्तिमत्त्व गजानन जनार्दन जागीरदार यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म अमरावतीत 2 एप्रिल 1907 रोजी झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. गजानन यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात झाले. बी.ए.ची पदवी प्राप्त झाल्यावर त्यांनी वर्ष 1930 मध्ये कोल्हापूर येथे शिक्षकीपेशा स्वीकारला. नोकरी करीत असतानाच नटवर्य बाबूराव पेंढारकर यांनी त्यांना प्रभात फिल्म कंपनीच्या मूकपटांची उपशीर्षके लिहिण्याचे काम सोपवले व त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध आला.
वर्ष 1930 मध्ये भालजी पेंढारकर ‘राणी रूपमती’ या मूकपटाचे दिग्दर्शन करत होते. त्यावेळी जागीरदार यांना पेंढारकरांचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सोपविली. प्रभात फिल्म कंपनीसाठी ते इंग्रजीमधून पत्रव्यवहार, वृत्तपत्रांसाठी वार्तापत्र करणे व शांतारामबापूंना दिग्दर्शनात साहाय्य करीत. या वेळी त्यांनी प्रभातच्या ‘अग्निकंकण’ (मराठी) व ‘जलती निशानी’ (हिंदी) या चित्रपटांत भूमिका केल्या.
वर्ष 1933-34च्या दरम्यान श्याम सिनेटोन नावाची चित्रपट संस्था कोल्हापूर येथे स्थापन झाली. या संस्थेमार्फत पार्थकुमार या चित्रपटाचे हिंदी व मराठी या दोन्ही भाषांतील चित्रपटाचे भालजी पेंढारकर दिग्दर्शन करत होते. परंतु काही कारणांमुळे भालजींनी हा चित्रपट सोडला. त्यामुळे निर्मात्यांनी जागीरदार यांच्याकडे दिग्दर्शनाचे काम सोपविले आणि त्यांचे दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल पडले. त्यांनी ‘सिंहासन’ (1934) व ‘होनहार’ (1936) हे चित्रपट दिग्दर्शित केले व त्यात अभिनयही केला. चित्रपटसृष्टीत अभिनय व दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर जागीरदार यांचे नाव घेतले जाऊ लागले. मिनर्व्हा मुव्हीटोनच्या सोहराब मोदी यांनी त्यांना आपल्याकडे बोलावून घेतले. या कंपनीत त्यांनी तीन वर्षे काम केले. यावेळी त्यांनी मिनर्व्हासाठी ‘मै हारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व अभिनयही केला.
प्रभात फिल्म कंपनीने वर्ष 1940च्या सुमारास जागीरदार यांना पुन्हा बोलावले व त्यांना ‘शेजारी’ (मराठी) व ‘पडोसी’ (हिंदी) या चित्रपटांत भूमिका दिल्या. या दोन्ही चित्रपटांत त्यांनी ‘मिर्झा’ या मुस्लीम शेजार्याची भूमिका उत्कृष्टपणे वठविली. जागीरदारांना बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे या भूमिकेसाठी 1941 मध्ये पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत अत्रे पिक्चर्ससाठी ‘पायाची दासी’ व ‘वसंतसेना’ हे दोन चित्रपट केले व पुन्हा प्रभात फिल्म कंपनीत दाखल झाले व त्यांनी ‘रामशास्त्री’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबर भूमिका केली.
पुणे येथे वर्ष 1960 मध्ये फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना झाली व जागीरदार यांची पहिले प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. काही वर्षे प्राचार्यपद सांभाळल्यावर ते पुन्हा चित्रपटसृष्टीत परतले. मात्र फिल्म इन्स्टिट्यूटमधे मानद प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करीत. स्वत:ची ‘जागीरदार प्रॉडक्शन’ या नावाने संस्था सुरू केली. ‘उमाजी नाईक’, ‘वैजयंता’ या चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन व अभिनयासह पार पाडली. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपतीपदक मिळाले.
त्यानंतर त्यांना ‘शाहीर परशुराम’ या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिके मिळाले. ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा बहुमान मिळाला. भारतीय बोलपटांच्या सुवर्णजयंती महोत्सवात वर्ष 1981 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते जागीरदार यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. जागीरदार यांनी ‘संध्याकाळ’ व ‘पाऊलखुणा’ ही दोन आत्मचरित्रे व ‘अभिनय कसा करावा’ व ‘दि मॅजिक सर्कल’ अशी एकूण चार पुस्तके लिहिली. त्यांचे 13 ऑगस्ट 1988 रोजी मुंबईत निधन झाले.