#विविधा : कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे… 

माधव विद्वांस 

“कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…’ अशी किती सुंदर गाणी ज्यांनी चित्रपटसृष्टीला दिली. त्या सामनामधील आरती प्रभूंच्या या गीताला चाल देणारे कै. भास्कर चंदावरकर यांचे आज पुण्यस्मरण. (निधन 26 जुलै 2009) त्यांचा जन्म पुणे येथे 16 मार्च 1936 रोजी झाला. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे… हे आरती प्रभू यांनी चित्रपटाच्या कथेला साजेसे गीत हे रचले, त्यावर चंदावरकरांनी संगीताचा साज चढविला व रवींद्र साठे यांनी ते गायले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सख्या रे घायाळ मी हरिणी…’ हे गाणेही असेच गाजले. जगदीश खेबूडकरांच्या या गीतालाही चंदावरकर यांनी संगीत दिले व लता मंगेशकर यांनी तितक्‍याच ताकतीने गायले. चंदावरकर यांनी प्रसिद्ध सतारवादक पं. रविशंकर व त्यांच्या पत्नी अन्नपूर्णादेवी यांच्याकडे शिक्षण घेतले. संगीत प्रशिक्षक म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी 15 वर्षें काम केले. “श्वास’, “सामना’, “गारंबीचा बापू’, “सरीवर सरी’, “एक डाव भुताचा’, “सिंहासन’, “आक्रित’, “चांदोबा चांदोबा भागलास का’, या चित्रपटातील संगीतबद्ध केलेली गाणी खूपच गाजली. ते प्रयोगशील संगीतकार होते. त्यांनी संगीतामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले. जुन्या-नव्याचा मेळ घालण्याचे उत्तम कसब त्यांच्याकडे होते. पाश्‍चात्य संगीताचीही त्यांना गोडी होती. टॉन द ल्यू, जोसेफ अँटोन रिडल आणि डिटर बॅच या पाश्‍चात्य संगीतकाराकडूनही त्यांनी संगीताचे धडे घेतले होते. गाजलेल्या “घाशीराम कोतवाल’ या नाटकालाही त्यांचे संगीत लाभले. कला छाया सांस्कृतिक केंद्राच्या श्रीमती प्रभा मराठे यांच्या एका नृत्यनाटिकेला दोन तासांचे संगीतही त्यांनी दिले होते. हिंदीमध्येही चंदावरकर यांनी काम केले.

भारतीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी जगभर व्याख्यानं दिली. चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे. अनेक भारतीय भाषांमधले सुमारे 40 चित्रपट भास्कर चंदावरकरांनी आपल्या संगीतानं सजवले. मृणाल सेनचा “खंडहर’, अपर्णा सेनचा “परोमा’, अमोल पालेकरांचा “थोडासा रुमानी हो जाए’, विजया मेहतांचा “रावसाहेब’, तसेच “आक्रित’, “कैरी’, मातीमाय’ हे त्यापैकी काही विशेष गाजलेले चित्रपट. “श्वास’ या चित्रपटाच्या संगीतासाठी चंदावरकरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर संगीत नाटक अकादमी पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)