विल्हेवाट

   अबाऊट टर्न 

बाजाराभिमुख जगात संस्कृती, कला, साहित्य या गोष्टी कचरामोलाच्याच ठरल्या आहेत. इतिहासाबद्दल थोडीफार आस्था दिसते; पण तोही निवडीचा भाग बनलाय. म्हणजे, प्रत्येक गटाला आपापल्या सोयीचा इतिहास हवाय. एरवी पैशामागे धावणाऱ्या या जगात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टींचा कचरा कधीच झालाय. आज 23 एप्रिल हा “जागतिक पुस्तक दिन’ आहे. आज एक तरी पुस्तक वाचायचंच किंवा विकत घ्यायचंच, असं किती जणांना मनापासून वाटतं? परंपरांवरचं आपलं प्रेमसुद्धा सेलिब्रिटींच्या उपस्थितीतील लाखोंचं बक्षिस देणाऱ्या मॉडर्न दहिहंडीच्या भोवतीच पिंगा घालतंय. आपल्याकडे सोंगाढोंगाचे उत्सव खूप होतात; पण त्यातून हाताशी फारसं काही लागत नाही. जे गरजेचं आहे तेच टिकवायचं आपलं धोरण आहे. मग आपली सांस्कृतिक केंद्रं तरी कशी शाबूत राहणार? अशा केंद्रांना उपयुक्त वास्तू बनवलं गेलं आणि गरजेप्रमाणं वापरलं गेलं, तर मात्र खडबडून जाग आल्याखेरीज राहत नाही.

औरंगाबादच्या 400 वर्षांचा इतिहास असलेल्या टाउन हॉलची आजची परिस्थिती पाहून हेच विचार येतात मनात. कचरा टाकायचा तरी कुठे, या प्रश्‍नाला औरंगाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी किती सोपं उत्तर शोधलं! कचऱ्याची समस्या जाणवू तर द्यायची नाही आणि तो टाकायला जागाही नाही म्हटल्यावर टाऊन हॉलमध्ये आणि ऐतिहासिक पैठण गेट दरवाजाच्या परिसरात कचरा लपवून ठेवला गेला. पण कचऱ्यासारखी दुर्गंधी पसरवणारी गोष्ट अशी लपून राहते का?आपला कचरा दुसऱ्याच्या दारात टाकणं हा त्यावरचा उपाय असू शकत नाही,हे यथावकाश मोठ्या शहरांच्या महापालिकांना समजून चुकलं.गावकऱ्यांनी कचरा डेपोला विरोध करायला सुरुवात केली. कचऱ्याच्या गाड्या अडवण्यात आल्या आणि मग शहरात कचऱ्याचे ढीग वाढू लागले. काही ठिकाणी तर कचरा डेपोजवळ असलेल्या गावातल्या कुटुंबांनी स्थलांतरं केल्याच्या घटना घडल्या. दुर्गंधी आणि रोगराई कुणाला सहन होणार?

शहरातले लोक महापालिकांच्या नावानं खडे फोडतात आणि ग्रामस्थ कचरा टाकू देत नाहीत, ही पालिकांची कोंडी फुटणार तरी कशी? औरंगाबादमध्ये नेमकी हीच परिस्थिती निर्माण झाली आणि कुणाच्या तरी सुपीक डोक्‍यातून कचरा लपवण्याची आयडिया आली. टाऊन हॉल या प्रसिद्ध सांस्कृतिक वास्तूत एक कलादालन आहे. पुढच्या पिढीला संस्कृती आणि इतिहासाची माहिती मिळावी, हा या दालनाचा उद्देश. शिवाय, तिथं एक बॅडमिन्टन कोर्टही आहे. खेळांच्या माध्यमातून लोकांनी तंदुरुस्त राहावं, शहरात चांगले खेळाडू घडावेत, हा त्यामागचा हेतू.

आज या वास्तूचा कचरा डेपो करण्यात आल्याचं उघड झाल्यामुळं खळबळ उडालीय. कोंडी फोडण्याचा हा कोणता मार्ग, असा प्रश्‍न विचारला जाऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला भेट दिली होती आणि कचराकोंडी फोडण्यात अपयश आल्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली होती. आगामी दहा दिवसांत त्यावर उपाय शोधण्यात येईल, असं महापौरांनी सांगितलं होतं. पण असा अजब उपाय शोधला जाईल, याची कल्पना कुणालाच नव्हती. सांस्कृतिक केंद्रांवर हीच वेळ येणं बाकी राहिलं होतं का?

– हिमांशु


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)