विलास लांडेंसाठी राष्ट्रवादीचे “लॉबिंग’

पिंपरी- शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार? या प्रश्‍नाचे उत्तर आता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. या मतदार संघातील उमेदवार ठरविण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. 14) मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची बारामती अतिथीगृह येथे शुक्रवारी (दि. 8) भेट घेत या मतदार संघातून विलास लांडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीला सातत्याने पराभव स्वीकारावा लागत असल्याने, या मतदार संघातून राष्ट्रवादीचे “हेवी वेट’नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने या मतदार संघाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर मात्र शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी पवार यांना या मतदार संघातून लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर या मतदार संघातून विलास लांडे, मंगलदास बांदल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद आणि मागील निवडणूक लढविलेली ऍड. देवदत्त निकम यांची नावे पुढे आली आहेत. यापैकी इच्छूक असलेले मंगलदास बांदल यांनी मतदार संघातील प्रमुख तीर्थक्षेत्रांवर पुष्पवृष्टी करत, आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या इच्छुकांपैकी विलास लांडे यांना याच मतदार संघामधून पराभव पत्करावा लागला आहे. त्यानंतर उभारी घेत, ते पुन्हा एकदा याच मतदार संघातून आपले नशीब आजमविण्यासाठी तीव्र इच्छूक आहेत. शिरूर लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे जुळविण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याची जोरदार चर्चा होती. याबाबत विलास लांडे यांना विचारले असता, भावकीतील वाद मिटल्यास ते चांगले आहे, असे सूचक वक्‍तव्य केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर आणि माजी नगरसेवक अतुल शितोळे यांच्या शिष्टमंडळाने पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. या चर्चेदरम्यान शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छूकांची संख्या वाढत असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. या मतदार संघात विजय मिळविण्याच्या दृष्टीने योग्य उमेदवार देण्याची पक्षाची भूमिका असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीकडून “वेट ऍण्ड वॉच’
शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीबाबत राष्ट्रवादीकडून सध्या तरी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अशोक मोहोळ यांच्यानंतर या मतदार संघात पुन्हा एकदा विजय मिळविण्याची राष्टवादीने खूणगाठ बांधली आहे. त्याकरिता सध्या तरी राष्ट्रवादीने या मतदार संघातील उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता बाळगली आहे. आग्रही मागणी होऊनही राष्ट्रवादीने आपले पत्ते अद्यापही उघड केलेले नाहीत. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवत, “वेट ऍण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)