विरोधकांना घाबरवण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर – ममता बॅनर्जींची पंतप्रधानांवर टीका

जलपायगुडी/ फलाकला (पश्‍चिम बंगाल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या मनात धास्ती निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करत आहेत, असा आरोप पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. आंध्रप्रदेशच्या मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने हटवण्यावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजप म्हणजे वसंतातील कोकिळ पक्षी
राष्ट्रीय नागरिक रजिस्टरला पश्‍चिम बंगालमध्ये कधीही परवानगी दिली जाणार नाही. “एनसीआर’ची पश्‍चिम बंगालमध्ये अंमलबजावणी करण्याचे आव्हानही ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिले. पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस सरकार सत्तेवर येण्यापूर्वी उत्तर बंगाल दुर्लक्षित होता. भाजपसारखे पक्ष केवळ कोकिळ पक्ष्याप्रमाणे वसंत ऋतूतच येतात. मात्र आम्ही इथल्या लोकांबरोबर 365 दिवस राहतो आहोत.

जर पंतप्रधानांना अशाच प्रकारे ऐनवेळचे फेरबदल करायला आवडत असेल, तर ते स्वतःच्या कॅबिनेट सचिवांना किंवा केंद्रीय गृहसचिवांना का हटवत नाहीत ? केंद्राकडून राज्यांमध्ये हस्तक्षेप का केला जातो आहे ? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग भाजपच्यावतीने काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपण स्वतः काही पंतप्रधानांबरोबर काम केले आहे. पण अशाप्रकारे सूडबुद्धीने कोणीही काम केलेले बघितले नसल्याचे त्या म्हणाल्या.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी आंध्रप्रदेशचे मुख्य सचिव अनिल चंद्र पुनेथा यांना पदावरून हटवले आणि त्यांच्या जागेवर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी एल.व्ही. सुब्रमण्यम यांची नियुक्‍ती केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कुटुंबीयांवर आणि आंध्रच्या मुख्यमंत्र्यांवरही प्राप्तीकर विभागाने छापे घातले. पश्‍चिम बंगालमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हटवण्याची कृतीही एकतर्फी, दुर्दैवी आणि भेदभावापूर्ण आहे. प्राप्तीकर विभाग, निवडणूक आयोग आणि सीबीआयचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतला जात असल्याची टीका बॅनर्जी यांनी केली.

पंतप्रधान मोदी हे आपल्याला घाबरले आहेत. जितके जास्त घाबरवण्याचा प्रयत्न कराल तितकी जास्त मी गुरकावेल, असा इशाराही त्यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.