विरोधकांचा सोमवारी महापालिकेला गाजरांसह घेराव

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोडबाबत प्रश्‍नांकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून येत्या सोमवारी (दि. 11) महापालिका मुख्यालयाला मानवी साखळीतून गाजरांसह घेराव घालणार आहेत. दुपारी तीन वाजता हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडकरांची शास्तीची धास्ती 15 दिवसात घालवू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 जानेवारी रोजी एका जाहिर कार्यक्रमात दिले होते. त्यानंतर विरोधकांनी शनिवार (दि.12) पासून मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे “काऊंट डाऊन’ सुरु केले होते. या आश्‍वासनाची आठवण करुन देण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दर्शनी भागात हा फलक लावण्यात आला होता. येत्या 24 जानेवारीला या आश्‍वासनाची मुदत संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर हा फलक काढून टाकल्याने विरोधक चांगलेच संतापले होते.

या प्रश्‍नावरून सत्ताधारी-विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच शास्तीकर जर पाप असेल तर पापाचे धनी असलेले जगताप आता तुमच्याकडे आल्याने शास्तीकराचा प्रश्‍न सोडविण्याची नैतिक जबाबदारी भाजपचीच आहे, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले शास्ती प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन न पाळल्यास त्यांना शहरात प्रवेश करु दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. याशिवाय केवळ 15 दिवसांचा कालावधी असल्याने कोणत्याही मिळकतधारकाने शास्तीची रक्कम भरू नये, असे आवाहन देखील केले होते. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या शहर दौऱ्यादरम्यान विरोधकांनी दहा वर्षे असे फलक लावावेत, असे वक्‍तव्य केल्याने विरोधकांना शास्तीचे आयते कोलीत मिळाले आहे.
दरम्यान, 24 जानेवारीला या आश्‍वासनाची मुदत संपल्याने विरोधकांनी आपल्या आंदोलनाची धार आणखी वाढविली आहे. आतापर्यंत झालेल्या मंत्रीमंडळात निणरयात शास्तीकराबाबत निर्णय न होऊ शकल्याने सर्व विरोधक एकत्र येऊन सत्ताधारी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. तर महापालिका मुख्यालयाला घेराव घालून शास्तीच्या प्रश्‍नाकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधणार आहेत. या घेराव आंदोलनामध्ये शहरातील सामाजिक संस्था, सर्व विरोधी राजकीय पक्ष व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
मेट्रोच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या (दि.9) पुण्यात येत आहेत. त्यांनी शहरवासियांना दिलेल्या शास्तीची धास्ती घालवण्याच्या आश्‍वासनाची आठवण करुन देण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

आमदार-खासदारांना “नो एंट्री’
शास्तीच्या मुदद्यावर सर्व विरोधक एकत्र आले आहेत. या आंदोलनात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरवासियांच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या विषयावर आंदोलन होत असल्याने शहरातील आमदार, खासदारांना या आंदोलनात सहभागी होऊ देणार नसल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. या लोकप्रतिनिधींनी सभागृहात आपली भूमिका प्रभावीपणे बजावावी, हा त्यामागील उद्देश आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.