पुणे – विमानतळ प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार दैनंदिन विमान उड्डाणांची संख्या दोनशेच्या घरात पोहोचली होती. मात्र गेल्या 5 महिन्यांत ती 150 ते 165 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे महसूल घटत असल्याचेदेखील समोर आले आहे. सर्वसाधारणपणे सुट्टीच्या दिवशी उड्डाणांची संख्या अधिक असते, मात्र दि. 7 रोजी केवळ 150 विमानांची उड्डाणे झाली.
गेल्या वर्षी लोहगाव विमानतळावरील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणाची संख्या 200वर पोहोचल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. दीड वर्षांपासून पुण्याहून अनेक नवीन मार्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, आता पुण्यातील विमान उड्डाणांची संख्या घटली आहे. “जेट एअरवेज’ या कंपनीची पुण्यातील उड्डाणे जवळपास बंद झाली आहेत.
विमान उड्डाणांची संख्या घटली असली, तरी देखील प्रवासी संख्येवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. दिवसेंदिवस पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची कोट्यवधींकडे जात आहे. मात्र, विमानाच्या उड्डाणांवर परिणाम झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.