विभागीाय आयुक्तांकडून विविध कामांचा आढावा

जिल्हा परिषदेमध्ये बैठक : प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 27 – राज्य व केंद्र शासनाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचवा, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सौजन्याची वागणूक द्या, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याला प्रथम प्राधान्य द्या, जिल्ह्यातील पाणीसाठ्यात कशापध्दतीने वाढ होईल याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, अशा सूचना करत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी मागील तीन महिन्यांत राबविण्यात आलेल्या उपक्रम, कामातील सातत्यता, नियोजन आणि सेवा हक्क हमी कायद्यांतर्गत सुरू असलेल्या सेवेचे त्यांनी कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीला विविध विभागांचे उपायुक्त यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, डीआरडीएचे प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीणकर, महिला व बालकल्याण विभागाचे दीपक चाटे, कृषी विभागाचे सुनील खैरनार, समाजकल्याणचे प्रविण कोरगंटीवार, आरोग्यचे डॉ. दिलीप माने आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी प्रधानमंत्री आवास योजना, नरेगा, 13 कोटी वृक्ष लागवड, अस्मिता, प्लॅस्टिक बंदी अंमलबजावणी, जलयुक्तशिवार योजना, टंचाई उपाययोजना, आरोग्य विभागाकडील नाविन्यपूर्ण उपक्रम, कुपोषण निर्मुलन याबाबत माहिती घेतली. त्यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या घरकुलाची बांधकामे त्वरीत पूर्ण करा असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. जलसंधारणामध्ये कमी खर्चात दुरुस्ती करून पाणी साठवण क्षमता वाढेल अशी कामे हाती घ्यावे, निलंबीत कर्मचाऱ्यांचे दोषारोपत्राचा विचार करून त्यावर निर्णय घ्यावा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले, मात्र या वृक्षांचे जतन करण्याचे नियोजन करावे. तसेच कुपोषण निर्मूलनासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले.

———————————–
अचानक भेटी देणार…
विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह काही विभागांच्या कामाचे कौतुकही केले. त्याचबरोबर जे विभाग कमी पडत आहेत त्यांना सूचना दिल्या. यापुढे पंचायत समितीच्या ठिकाणी गटविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामांचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट देणार आहे. त्यामध्ये क्षेत्रीय कामांची पाहणी करणार असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तालुक्‍याच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)