विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा – अशोक चव्हाण

मुंबई – राजकीय फायद्यासाठी भीमा-कोरेगावची दंगल घडवून मराठा विरुध्द दलित असा संघर्ष निर्माण केला गेला. आता मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन चिघळवून मराठा विरुध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप करतानाच फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी सर्व समाजांनी एकत्र येऊन सरकारचा हा कट उधळून लावावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा आरक्षणाबाबत चर्चा खुप झाल्या आहेत आता चर्चा नाही कृती करा! त्यासाठी विधिमंडळाचे एकदिवशीय विशेष अधिवेशन सरकारने बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली.

गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, जाती-जातीत संघर्ष पेटवून मराठा समाजाला एकटे पाडायचे. इतर समाजांना त्याच्याविरोधात लढवून ध्रुवीकरण करायचे, हा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. राजकीय फायद्यासाठी सरकार अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. मतपेटीच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप सरकारने राज्यातील सामाजिक एकता व बंधुभावाच्या भावनेला नख लावले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंढपूरच्या गर्दीत साप सोडून चेंगराचेंगरी घडवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. गुप्तचर विभागाकडे याचे पुरावे आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. सरकारकडे पुरावे होते तर मग कारवाई का केली नाही? असा संतप्त सवाल करून वारकऱ्यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणाऱ्यांच्यांच डोक्‍यात येऊ शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

काकासाहेब शिंदे या आंदोलक युवकाने जलसमाधी घेतली. जगन्नाथ सोनावणे या आंदोलकाने विष प्राशन केले होते त्यांचाही आज मृत्यू झाला. दोन आंदोलकांच्या मृत्यूनंतरही सरकार ढिम्म बसले आहे. आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही. नेमक्‍या किती आंदोलकांचा जीव गेल्यावर सरकार चर्चा करणार आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

यावेळी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, पक्षाचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस यशवंत हाप्पे, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे उपस्थित होते. आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज परळी येथे जाऊन आंदोलनकर्त्या मराठा बांधवाची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)