विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किंमत मोजावी लागेल

जिल्हा परिषदेचे सदस्य रणजीत शिवतरे यांचा इशारा

कापूरहोळ- बारामती लोकसभा मतदार संघातील भोर-वेल्हा तालुक्‍यात कॉंग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळणार नाही. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भोर कॉंग्रेसच्या नेतृत्वाला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य आणि माजी बांधकाम सभापती रणजीत शिवतरे यांनी नसरापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

शिवतरे यांनी म्हणाले की, लोकसभा निवडणुुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या वतीने भोर-वेल्हा तालुक्‍यात विविध भागात पाच सभा घेण्यात आल्या होत्या. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी केवळ औपचारीकता म्हणून स्टेजवर उपस्थित होते. पण प्रचारात कोणीही सहभाग घेतला नाही. प्रचारा दरम्यान, विद्यमान आमदार वेल्हा-मुळशीत फिरकलेच नाहीत. त्यांनी केवळ दिवस काढण्याचे काम केले. मतदानाच्या दोन दिवस अगोदर विश्‍वासू कार्यकर्त्यांना हाताशी धरून आघाडीच्या विरोधात मतदान करण्यासाठी यंत्रणा राबविली गेली. तर उलट आम्हीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी करीत नाही असे खोटे आरोप केले.

भोर-वेल्हा-मुळशीत गेले अनेक वर्ष कॉंग्रेसची एक हाती सत्ता आहे, असे असताना नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य हाताशी असतानाही उघड उघड विरोधी भूमिका घेतली. मतदानाच्या दिवशी मतदान बुथवर कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी फिरकले नाहीत. विरोधात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे भोर-वेल्हा-मुळशीच्या कॉंग्रेस नेतृत्वाला याची किंमत आगामी विधानसभा निवडणुकीत मोजावी लागेल, असा इशारा शिवतरे यांनी दिला. तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आघाडीत बिघाडी झाल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.