विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ‘महाजनादेश यात्रा’

1 ते 31 ऑगस्टदरम्यान चालणार यात्रा

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ते राज्य पिंजून काढणार आहेत.

भाजपाची महाजनादेश यात्रा 1 ते 31 ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. एकीकडे शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपानेही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाजनादेश यात्रा काढण्याचे निश्‍चित केले आहे. दरम्यान, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आज मुंबईत असून, त्यांच्यासोबत भाजपाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.