विद्यार्थ्यांच्या अपघात विमा योजनेला “ब्रेक’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी असलेली अपघाती विमा योजना यंदाच्या वर्षी बंद केली आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांसाठी अपघाती विमा योजना राबविण्यात आली होती. मात्र, यंदा महापालिकेने विद्यार्थ्यांचा विमा उरविला नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवी पर्यतच्या विद्यार्थ्यांचे विमा उतरवण्यात येतात. मात्र, या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची असूनही यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांचा अपघाती विमा उतरवण्यात आलेला नाही. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या एकशे पाच शाळा आहेत. मागील वर्षी तब्बल 37664 विद्यार्थ्यांचा पंधरा लाख पंधरा हजार नऊशे रुपयांचा विमा उतरवण्यात आला होता. त्यावेळी, महापालिकेने खासगी कंपनीला विमा काढण्याचे काम दिले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने प्रती चाळीस रुपये पंचवीस पैसे एवढी रक्कम भरलेली होती. मागील वर्षी विमा उतरवल्यामुळे एका विद्यार्थ्यांला विम्याचा लाभ मिळून भरपाई मिळाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपघाती विद्यार्थ्यांना औषधोपचारासाठी खर्च मिळणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी येताना व जाताना अनावधानाने अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मात्र, यंदा विमा न उतरवल्याने एखादा अपघात झाल्यास विद्यार्थ्यांची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यानंतर अपंगत्व, गंभीर अथवा किरकोळ जखमी, मृत्यूही होण्याची शक्‍यता असते. यावेळी, प्रत्येक विद्यार्थ्यांना मदत म्हणून विमा उतरवण्याची आवश्‍यकता आहे. अपघातानंतर विम्याची जास्तीत-जास्त रक्कम एक लाखापर्यत मिळण्याची तरतूद मागील वर्षी करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षी अपघाती विमा योजना राबविण्यात आली होती. मात्र, यंदा विद्यार्थ्यांचे विमा उतरविण्यात आलेले नाहीत. याबाबत, महापौर व आयुक्तांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे यांनी सांगितले.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्याचा अपघाती विमा न उतरवल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. महापालिका शाळेत शहरातील सर्वसामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असून एखाद्या अपघात झाल्यास त्यांना खर्च पेलवणे अशक्‍य असते. यामुळे, विद्यार्थ्यांच्या औषधोपचाराला मदत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांचा विमा उतरवण्याची आवश्‍यकता असल्याचे, पालक सदानंद डोईफोडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा अपघाती विमा उतरविण्याची आवश्‍यक आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यात आलेला होता. परंतु, यंदाच्या वर्षी त्यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. पुढील वर्षी होणाऱ्या “बजेट’मध्ये विद्यार्थ्यांचा विमा काढण्यासाठी तरतूद केली जाणार आहे.
– प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, महापालिका शिक्षण समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)