विद्यार्थी, ग्रामस्थांचा मृत्यूच्या दाढेतून प्रवास

महादेव वाघमारे

वडगाव मावळ – सांगवी-वडगाव मावळ रस्त्यातील खापरे ओढ्यावरील जीर्ण धोकादायक पुलाच्या कामाचे अनेकवेळा भूमिपूजन झाले असून या जीर्ण धोकादायक पुलाचा संरक्षण कठडा बराचसा भाग कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र, हा पूल केव्हाही कोसळण्याची भिती आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना होऊनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दुरुस्ती अभावी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मृत्यूच्या दाढेतून प्रवास करावा लागत असून पुलाची व रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव – कातवी नगरपंचायतीला जोडणाऱ्या सांगवी – वडगाव रस्त्यातील खापरे ओढ्यावरील पुलाचे दगडी बांधकाम पुणे जिल्हा परिषदेने 56 वर्षापूर्वी केले. या पुलाची अनेक वेळा तात्पुरती डागडुजी केली. त्यातच मावळात सुरु असलेल्या पावसाने या जीर्ण धोकादायक पुलाचे संरक्षक कठडे कोसळून पडले असून पुलाचा बराच भाग कोसळला आहे. पूल इतका जीर्ण झाला असून कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. या मार्गावर खापरे ओढ्याचे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाहत असून धोकादायक जीर्ण पुलावरून ये-जा होत आहे.

विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी, ग्रामस्थांच्या दुचाकी व चारचाकींची वर्दळ सुरु असते. त्यातच मावळात सुरु असलेल्या पावसाने या जीर्ण धोकादायक पुलाचा भाग जागोजागी खचला आहे. या पुलाच्या रस्त्यावर खापरे ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने या गावाचा संपर्क तुटत असतो. तर काही विद्यार्थी व ग्रामस्थ जीव धोक्‍यात घालून वाहत्या पाण्यातून ये-जा करतात. प्रसंगी या पाण्यातून विद्यार्थी व नागरिक वाहून जाण्याची दाट शक्‍यता आहे. प्रभाकर पगडे यांनी जीर्ण धोकादायक पुलाला पर्यायी मार्ग म्हणून ओढ्याच्या बाजूला डबर व मुरुमाने रस्ता केला होता. ओढ्याच्या पाण्याने तो रस्ता वाहून गेल्याने केवळ एकमेव जीर्ण धोकादायक पुलावरून जीव मुठीत घेवून विद्यार्थी व ग्रामस्थांना ये-जा करावी लागत आहे.
धोकादायक पुलाची व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश पगडे, माजी उपसरपंच काशिनाथ तोडकर, सचिन पगडे, महेश ओव्हाळ, अमोल धिडे, अनिल खांदवे, सुनील खांदवे, गोविंद ओव्हाळ, बबन खांदवे, छबू ओव्हाळ, विनायक तोडकर, अमित ओव्हाळ, गणेश गोविंद ढोरे, महादू खांदवे, जालिंदर तोडकर, गौरव खांदवे व नागरिकांनी केली.

भूमिपूजन होऊनही पुलाला मुहुर्त लाभेना
मावळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाला या पुलाकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही. मावळचे आमदार संजय भेगडे यांनी मे 2018 अखेर या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले. काही दिवसातच पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन दिले. या पुलाचे अनेकवेळा भूमिपूजन झाल्याने पुलाचे काम कधी सुरु होणार याची प्रतीक्षा आहे. ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. जीवित हानी झाल्यानंतरच पुलाची दुरुस्ती करणार का?, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

धोकादायक पुलांवरुन वाहतूक सुरुच
रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पूल कोसळून 2 ऑगस्ट 2016 रोजी मोठी दुर्घटना झाली होती. यात 42 निष्पापांचा बळी गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने मावळ तालुक्‍यातील कान्हे- टाकवे बुद्रुक मार्गातील इंद्रायणी नदीवरील पूल, तळेगाव-चाकण राज्य मार्गावरील रेल्वे पूल, पाथरगाव येथील पुणे-मुंबई महामार्गावरील इंद्रायणी नदी पूल, इंदोरी येथील इंद्रायणी नदीवरील पूल, तळेगाव दाभाडे – आंबी मार्गावरील इंद्रायणी नदीवरील पूल, सुदुंबरे येथील तळेगाव-चाकण मार्गावरील पूल आदी धोकादायक झाल्याने अवजड वाहतुकीसाठी बंद केले असून या घटनेला 2 वर्षे होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धोकादायक पुलाचे फलक केवळ नावालाच असून या पुलावरून सर्रास अवजड वाहतूक सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)