विद्यार्थीनी, महिलांना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

पिंक बेल्टचा उपक्रम; साताऱ्यातील युवतीचा पुढाकार

सातारा, दि.1 (प्रतिनिधी)
शाळा, महाविद्यालयातील मुली तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून होणाऱ्या छेडछाडीचा सामना करावा लागतो. अनेकदा त्यांचा प्रतिकार होत नसल्याने त्यातून दुर्घटना घडते. त्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पिंक बेल्टच्या माध्यमातून साताऱ्यातील संध्या गायकवाड या युवतीने पुढाकार घेतला आहे. गायकवाड हिने प्रसिध्द प्रशिक्षक अपर्णा रजावत यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे सतरा हजार तरुणी, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत.

पिंक बेल्टच्या माध्यामातून देशभरातील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत. त्यामध्ये कराटे, धावणे, प्रतिकार करण्याचे तंत्र तसेच अचानक समोर आलेल्या संकटाचा सामना कसा करायचा? याचे प्रशिक्षण दिले जात आहे. शाळकरी मुलींबरोबरच गृहिणी, महिला पोलीस कर्मचारी, शिक्षक, कामगार आदी महिलांचा त्यात समावेश आहे. या प्रशिक्षित मुलींनी अपप्रवृत्तीचा सामना करत संकटाचा मुकाबला अनेकदा केला आहे. राज्यात व देशातील काही महाविद्यालयात शिक्षण घेत असताना गुंड मुलांच्या टोळक्‍याने महाविद्यालयीन मुलींना त्रास दिला जातो.

त्याला कंटाळून अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागले. त्यामुळे अनेकदा आत्महत्येचे प्रकार घडले आहेत. अशा गोष्टींतूनच गेल्या तीन वर्षापूर्वी उत्तरप्रदेशातील आग्रा या शहरातून पिंक बेल्टच्या कार्याला सुरूवात झाली. तेव्हापासून मुलींना अशा अपप्रवृत्तीचा सामना करता यावा, म्हणून अपर्णा रजावत यांनी यासाठी काम करण्याचे ठरविले. अल्पावधीतच या उपक्रमाने देशातील महिलांना प्रशिक्षीत करण्याचे काम केले.

त्याला साद घालत साताऱ्यातील संध्या गायकवाड या युवतीने साताऱ्यासह महाराष्ट्रातील युवतींना प्रशिक्षीत करण्यासाठी राज्यभर उपक्रम राबवण्यास सुरूवात केली. गायकवाड हिने महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याअगोदर स्वतः प्रशिक्षण घेतले आहे. देशातील महिलांना प्रशिक्षणाची नोंद विक्रमाकडे चालली असतानाच आता संध्याने साताऱ्यातील महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा विडा उचलला आहे.

काय आहे पिंक बेल्ट
अपर्णा रजावत यांनी आग्रा येथून सुरू महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आहे. देशभरातील 15 लाख महिला, युवतींना प्रशिक्षण दिल्यानंतर या उपक्रमाची आता जागतिक विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे. मोठ्या शहरातील मुली, महिलांना कायदेविषय, मानसिक, तांत्रिकदृष्या सक्षम करून त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. त्यानंतर त्यातील उत्तम प्रशिक्षकाला तालुका, गाव स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी नेमले जाते. अशा पध्दतीने हे प्रशिक्षणाचे जाळे देशभर विणण्याचे काम या संस्थेकडून सुरू आहे.

अभिनेत्री ते प्रशिक्षक
संध्या गायकवाड ही साताऱ्याची युवती सध्या एका गाजेलेल्या मराठी मालिकेत अभिनेत्री म्हणून काम करत आहे. मात्र, महिलांच्या संरक्षणासाठी काही तरी करायचे ठरवून तिने अभिनयासोबतच आता प्रशिक्षक म्हणून नवे आव्हान स्विकारले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.