विद्यापीठात दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार!

पुढील महिन्यात प्रवेशप्रक्रिया, टप्पाटप्प्याने बहि:स्थ बंद

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 18 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “मुक्त अध्ययन संकुल’मार्फत यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम. आणि एम.बी.ए. हे अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीवर (डिस्टन्स एज्युकेशन) सुरू करण्यात येणार आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन आणि अध्ययनाचे साहित्य पुरवले जाणार असल्याने त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारणेही शक्‍य होणार आहे. याची प्रवेशप्रक्रिया पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

दरम्यान, बहि:स्थ अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष प्रवेश स्थगित करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला असून, प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया बहि:स्थ ऐवजी दूरशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे होणार आहे. मात्र, पूर्वीच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी पदवीसाठीचे द्वितीय व तृतीय वर्षाचे व पदव्युत्तरांसाठी द्वितीय वर्षाचे प्रवेश हे बहि:स्थ म्हणूनच देण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

दूरशिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना विविध केंद्रांवर त्या त्या विषयाचे मार्गदर्शन व अध्ययनासाठीचे आवश्‍यक साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे विषयाचा अधिक चांगल्याप्रकारे अभ्यास व्हावा, यासाठी वेळोवेळी “असाईनमेंट’ करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा बहि:स्थ शिक्षण पद्धतीत उपलब्ध नव्हती. तसेच, विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन संकुलमार्फत पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशानुसार अभ्यासकेंद्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे अभ्यासक्रम इतर नियमित अभ्यासक्रमाप्रमाणेच राहतील व सत्र ऐवजी वार्षिक परीक्षा पद्धत श्रेयांकांनुसार मूल्यमापन पध्दत राबविण्यात येईल. दूरशिक्षण अभ्यासक्रमाबाबत प्रवेश, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांसाठी मदत, सूचना, आदी सुविधांसाठीचे स्वतंत्र वेब पोर्टल तयार केले जात आहे. तसेच, येत्या ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दूरशिक्षण अभ्याक्रमाचे प्रवेश सुरू करण्यात येतील, असेही डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले.

दूरशिक्षण विभागामार्फत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी माध्यमामध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अभ्यासकेंद्रावर प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग विद्यापीठातर्फे चालविले जाणार आहेत. या वर्गाचे वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेनंतर जाहीर करण्यात येईल. दूरशिक्षण व्यवस्थेद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व उत्तम दर्जाच्या मार्गदर्शनाद्वारे पदवी व पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध करून देण्याचा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बहि:स्थ अभ्यासक्रम कालबाह्य होणार
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) बहि:स्थ अभ्यासक्रम प्रवेशाला कात्री लावली आहे. बहि:स्थ अभ्यासक्रमातून शिक्षणाची संधी पूर्ण होईल. मात्र गुणवत्तेचा प्रश्‍न उपस्थित होत असून, आता बहि:स्थ अभ्यासक्रम काळाच्या ओघात कालबाह्य ठरत आहे. “यूजीसी’ने बहि:स्थ ऐवजी दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश सर्व विद्यापीठांना दिले आहेत. त्यानुसार आता पुणे विद्यापीठाने दूरशिक्षण पद्धत सुरू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

दूरस्थ: शिक्षणपद्धती ही अधिक कालसुसंगत आणि विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. तसेच, ती राबविल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात “यूजीसी’ची गुणवत्ता सुधारणेबाबतची मार्गदर्शक तत्वे अधिक चांगल्याप्रकारे राबवता येणार आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. संजीव सोनवणे
संचालक : “मुक्त अध्ययन संकुल’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)