विद्याधाम प्रशाला महाविद्यालय शिक्रापुरातून हद्दपार करा

शिक्रापूर-येथील विद्याधाम प्रशाला या महाविद्यालयामध्ये शिक्षकाकडून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार झाल्यानंतर गावामध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये विद्यालयाबाबत निर्णय घेण्याचे ठरले होते. आज आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाची विद्याधाम प्रशाला शिक्रापुरातून हद्दपार करत ग्रामस्थांच्या ताब्यात विद्यालय घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्याधाम प्रशालेत 23 मे रोजी शिक्षकाकडून महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार झाला असल्याची घटना समोर आली. त्यानंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. 26 मे रोजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत शिक्षण मंडळावर गुन्हा दाखल करत शिक्षण संस्था बदलण्याबाबत चर्चा करण्यात आली; परंतु या शिक्षण संस्थेबाबत निर्णय घेण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आज सरपंच जयश्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करून घडलेल्या घटनेचा तसेच शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सरपंच जयश्री भुजबळ, उपसरपंच आबाराजे मांढरे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, अरुण करंजे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ सासवडे, जयश्री दोरगे, रोहिणी गिलबिले, संतोष भुजबळ, मिना सोंडे, गौरव करंजे, सागर सायकर, सुजाता खैरे, निलेश थोरात, गिता चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्ष सासवडे, उत्तम गायकवाड, मोहन विरोळे, तलाठी डी. एस. भराटे, माजी शिक्षक अकबर तांबोळी गुरुजी, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, सोमनाथ भुजबळ, काका चव्हाण, राजेंद्र मांढरे, बाबा चव्हाण, रमेश भुजबळ, पंढरीनाथ गायकवाड, मंगेश विरोळे, तानाजी राऊत, महादेव गायकवाड, विजय लोखंडे, तुषार आळंदीकर, शरद मांढरे, अमोल बैलभर, सुजित विरोळे, रमेश गडदे यांसह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यालयात चाललेल्या अनेक गैरप्रकाराबाबत चर्चा करण्यात आली. महाविद्यालयीन शिक्षकांनी जादा क्‍लासेससाठी घेतलेले पैसे परत देण्याची मागणीकरण्यात आली. शाळेची इमारत ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्याची, इतर दोषी शिक्षक व प्राचार्यांचे निलंबन, तसेच विद्याधाम प्रशाला ग्रामस्थांकडे वर्ग करावे, शिक्रापूर परिसरामध्ये महाविद्यालयीन शिक्षक घेत असलेले जादा क्‍लासेस बंद करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. येत्या काळामध्ये शाळेकडे विशेष लक्ष केंद्रित करून शाळेसाठी विशेष कमिटी नेमण्याचा व प्रत्येक तीन वर्षाला शिक्षक बदलीचा देखील निर्णय घेण्यात आला व शाळेचे वातावरण चांगले ठेवण्याबाबत सर्व ग्रामस्थ एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • शाळेच्या विषयात राजकारण नको
    महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गावातील सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ गट तट बाजूला ठेऊन एकत्र आले. ही चांगली बाब असून गावच्या शाळेच्या निर्णयासाठी सर्वांनी एकत्र यावे व शाळेच्या विषयात राजकारण नको, असे तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्ष सासवडे यांनी सांगितले.
  • शिक्षकांना मोबाईल बंदी
    शिक्रापूर येथील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षक तसेच विद्यार्थी मोबाईल वापरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे देखील लक्ष राहत नाही. यामुळे महविद्यालयामध्ये शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी करण्याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)