#विदेशरंग: दिनवाणी आईचे गर्भश्रीमंत पुत्र 

देविदास देशपांडे 
भारताचे मॉरिशस, गयाना आणि त्रिनिदाद यांसारखे पुत्र हिंदीने समृद्ध होत असतीलही, परंतु प्रत्यक्ष माता म्हणजे भारत त्यापासून वंचितच आहे. पुत्र गर्भश्रीमंत झाले परंतु आई दिनवाणी उभी आहे. कुसुमाग्रजांनी मराठीचे जे वर्णन केले, त्याचीच ही हिंदी आवृत्ती म्हणायची. 
मॉरिशस म्हणजे पुत्र आहे आणि भारत म्हणजे आई आहे. हा मॉरिशस संयुक्‍त राष्ट्रात हिंदी भाषेला तिची ओळख मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडेल, ही ग्वाही दिली मॉरिशसचे मार्गदर्शक मंत्री अनिरुद्ध जगन्नाथ यांनी. त्यांच्या या वक्‍तव्याला महत्त्व यासाठी की, ते यंदाच्या जागतिक हिंदी संमेलनाचे यजमान होते. हे संमेलन अशा प्रकारचे अकरावे संमेलन होते आणि 18 ते 20 ऑगस्ट असे तीन दिवस ते चालले. या संमेलनाच्या समारोप सत्रात बोलताना जगन्नाथ म्हणाले, अन्य भाषांप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदीला तिचे स्थान मिळण्याची वेळ आली आहे. भारताला आम्ही माता म्हणतो त्यामुळे या नात्याने मॉरिशस हा पुत्र होतो. अन्‌ हा पुत्र मॉरिशस आपले कर्तव्य पुरेपूर जाणतो. 
मॉरिशसमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांचे पूर्वज ब्रिटिशांच्या काळात भारतातून मॉरिशसला गेले होते. यात हिंदी भाषकांचे प्रमाण मोठे आहे. येताना हे मजूर आपली भाषा आणि संस्कृती घेऊन आले होते. याच भांडवलाच्या आधारावर त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले. त्यांनीच मॉरिशसच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. त्यांची पुढची पिढी आज मॉरिशसवासी म्हणून देशाचे नेतृत्त्व करत आहेत. जगन्नाथ हे अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतात. 
केंद्र सरकारने जागतिक हिंदी सचिवालयाच्या स्थापनेसाठी मॉरिशसचीच निवड केली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सचिवालयाची पायाभरणी केली होती. हाच धागा पकडून या संमेलनात परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी विश्‍वास व्यक्‍त केला, की हिंदी अत्यंत गुपचूपपणे विश्‍वभाषा बनली असून आपल्याला जे दिसत नाही ते संपूर्ण देश पाहत आहे. जगातील अनेक देशांतील विमानतळांवर टीव्हीवर हिंदी चित्रपट, हिंदी मालिका पाहायला मिळतात. बगदाद आणि दमिश्‍क येथे मला हा अनुभव आला आहे. मॉरिशसमध्येही हिंदीचा प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतो, असे ते म्हणाले. या संमेलनाचे उद्‌घाटन करताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, की विविध देशांमध्ये हिंदीला वाचविण्याची जबाबदारी भारताने उचलली आहे. भाषा आणि संस्कृती हे एकमेकांशी जोडलेले असतात. भाषेला वाचविण्याची, तिला पुढे नेण्याची आणि तिची शुद्धता टिकविण्याची आज गरज आहे. 
अकबर आणि स्वराज यांचा हा दुर्दम्य आत्मविश्‍वास अनाठायी नाही. परदेशात आज हिंदी बऱ्यापैकी सुस्थापित झाली आहे. संयुक्त राष्ट्राने हिंदीतून साप्ताहिक बातमीपत्र सुरू केले आहे. हे बातमीपत्र प्रत्येक शुक्रवारी प्रसारित होते. संयुक्त राष्ट्राने हिंदीतून ट्‌विटर खातेही सुरू केले आहे. तसेच युनोच्या संकेतस्थळावर प्रमुख दस्तऐवजही हिंदीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इंग्लंड व कॅनडाचे नेते निवडणूक प्रचार करताना हिंदी वापरतात. परंतु भारताचे “पुत्र’ म्हणविल्या जाणाऱ्या देशांमध्ये हिंदीची ही घोडदौड सुरू असताना प्रत्यक्ष भारताचे काय हाल आहेत? 
भारत सरकार हिंदीला आंतरराष्ट्रीय साज चढवत असताना आणि विविध देशांमध्ये तिचा स्वीकार होत असताना, जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. इंग्रजी आल्याशिवाय तुम्हाला उत्तम पगार असलेली नोकरी मिळत आहे, हीच प्रतिमा लोकांच्या मनात आहे. हिंदी भाषेतील वृत्तपत्रे, वाहिन्या हे भ्रष्ट भाषांची उदाहरणे बनली आहेत. खासकरून वृत्त वाहिन्यांचा भाषेचा दर्जा अत्यंत खालावला आहे. त्यामुळे हिंदीच्या प्रादेशिक बोलभाषांचे महत्त्व कमी होत असल्याचे, हिंदी भाषकांना जाणवत आहे. या वाहिन्यांनी हिंग्लिश हीच आपली भाषा बनविली आहे आणि राष्ट्रीय भाषा म्हणून तिची प्रतिष्ठापना करण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे एकीकडे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का नाही, म्हणून डोकेफोड होत असताना त्या हिंदीला धक्‍का देणारी तिची सवत आली आहे. 
देशी वृत्तपत्रांनीही हिंग्लिशला आपल्या डोक्‍यावर बसवून घेतले आहे. मुख्यमंत्र्यांऐवजी सीएम किंवा पंतप्रधानऐवजी पीएम वापरणे एक वेळ समजता येईल, परंतु त्यासाठी उच किंवा झच असे लिहिण्याची काय गरज आहे? परंतु हिंदी माध्यमांतील सध्याचे प्रचलन हेच आहे आणि हिंदीचाच शब्द वापरायचा झाला तर या “भेड़चाल’मध्ये सर्वजण सामील आहेत. आज शुद्ध हिंदीचा आग्रह धरणे हा वेडगळपणा, मागासलेपणा समजण्यात येतो. केवळ आठ हिंदी वृत्तपत्रांनी एका महिन्यात 15 हजार 737 इंग्रजी शब्दांचा वापर केला होता, असे माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता आणि संवाद विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले होते. 
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक केदारनाथ सिंह यांनी एकदा बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की हिंदी ही बाजारपेठेची भाषा बनली आहे; परंतु ज्ञान आणि विज्ञानाची भाषा बनलेली नाही. हिंदी पत्रकार राहुल देव हे भाषेच्या खालावलेल्या परिस्थितीबाबत वारंवार चिंता व्यक्त करतात. गेल्या वर्षी नागपूर येथे भारतीय हिंदी परिषदेचे अधिवेशन झाले होते. त्यावेळी देव म्हणाले होते, की मराठी, कन्नड किंवा अन्य अनेक भाषांमध्ये लोकांचे भाषेबद्दल जे प्रेम दिसते ते हिंदीमध्ये दिसत नाही. पुण्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचा दाखला देऊन ते म्हणाले होते, की या संमेलनात ज्याप्रमाणे लोक आले आणि मराठी भाषेकडे त्यांचा ओढा दिसला तसे हिंदीबाबत कधीही झाले नाही. त्यामुळे हिंदीला भविष्यात वाचविण्याची गरज आहे. 
परदेशी विमानतळावर बॉलीवूडचे चित्रपट दिसल्याबद्दल एम. जे. अकबर यांनी भलेही समाधान व्यक्त केले असेल, परंतु या चित्रपटांमध्ये तरी आता कितीही हिंदी राहिली आहे? अभिनेता इरफान खान याची मुख्य भूमिका असलेला “हिंदी मीडियम’ हा चित्रपट गेल्या वर्षीच आला होता. हिंदी भाषकांची स्वतःच्या भाषेबद्दल असलेली न्यूनगंडाची भावना त्यातून पुरेपूर व्यक्‍त झाली होती. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस इरफान म्हणाला होता, की बॉलीवूडमध्ये हिंदीची स्थिती चिंताजनक आहे. आपल्या देशामध्ये लोक दुसऱ्यावर श्रेष्ठता गाजविण्यासाठी इंग्रजी शिकतात. बॉलीवूडमधील बहुतांश कलावंत इंग्रजीत विचार करतात आणि नंतर ते हिंदीत उतरवतात. इतकेच नाही तर हिंदीचा संपूर्ण व्यवहार इंग्रजीत होत असून हिंदीची लिपी इंग्रजी (रोमन) करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबद्दलही इरफान खानने चिंता व्यक्‍त केली होती. 
आपणसुद्धा लक्ष दिले तर हिंदी चित्रपटांमध्ये इंग्रजी किंवा रोमन लिपीचा वाढता प्रभाव आपल्याला दिसून येईल. एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरवर देवनागरी नाव बघून आपल्याला किती दिवस झाले? चित्रपटाची श्रेय नामावली (क्रेडिट्‌स किंवा टायटल्स!) देवनागरी लिपीत बघून आपण शेवटची कधी बघितली होती? त्यामुळे हिंदीविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)