#विदेशरंग: आता तरी सुधारतील का भारत-पाक संबंध? 

स्वप्नील श्रोत्री 
भारत व पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत. भारताने अण्वस्त्रांच्या बाबतीत ‘नो फर्स्ट यूज’ पॉलिसी जाहीर केलेली आहे. तरीही पाकिस्तानकडून भारताला सतत अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी दिली जाते. पाकिस्तानमध्ये लोकनियुक्‍त सरकार व पाकिस्तानी लष्कर यांच्यात बेबनाव आहे. त्यांच्यामध्ये असलेले अंतर्गत वाद, गटबाजी आणि पाकिस्तानी जनतेच्या मनात भारताविरोधात निर्माण करण्यात येणारी भीती यामुळे गेल्या अनेक वर्षात प्रयत्न करूनही भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधात कधीही सुधारणा झालेली नाही. 
भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल भाष्य करताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असे म्हटले होते की, “तुम्ही तुमचे मित्र बदलू शकता, मात्र शेजारी नाही.’ भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानात जरी राजकीय घडामोडी होत असल्या तरीही त्याचा थेट परिणाम भारताच्या शांतता व स्थैर्य ह्यावर होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील घडामोडींवर लक्ष ठेवणे व त्यानुसार आपले धोरण ठरविणे भारतासाठी गरजेचे आहे. जम्मू आणि काश्‍मीर व भारताच्या अंतर्गत बाबीत लक्ष देऊन आपला अमूल्य वेळ न दवडता नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानला विकासाच्या मार्गावर नेले पाहिजे; कारण याचे फलीत जागतिक शांततेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचे असणार आहे. 
भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांना जवळपास 70 वर्षांचा रक्‍तरंजित इतिहास आहे. जगातील सर्वाधिक धोकादायक आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून भारत-पाकिस्तान सीमा ओळखली जाते. या दोन राष्ट्रांमध्ये 1947 ला झालेल्या फाळणीचे दुःख, अनेक वर्षे चिघळलेला जम्मू-काश्‍मीर प्रश्‍न, आतापर्यंतची चार युद्धे, सिंधू नदी पाणी वाटपातील वाद, दहशतवाद्यांच्या मदतीने भारतात अस्थिरता माजवण्याचा पाकचा प्रयत्न अशा कारणांमुळे भारत-पाकिस्तान संबंध सतत बिघडलेले असतात. 
भारताबद्दल इम्रान खान म्हणाले होते की, संबंध सुधारण्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे या; तर आम्ही दोन पावले पुढे येवू. भारताने मात्र यापूर्वी अनेक वेळा शांततेचे प्रयत्न केलेले आहेत. लष्करी पातळीवरील दोन्ही देशांच्या डीजीएमओची बैठक, असे अनेक हरतऱ्हेचे प्रयत्न भारताकडून यापूर्वीही झालेले आहेत. दिल्ली-लाहोर बस सेवा, नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाहोरमध्येही जाऊन आले. मात्र भारताच्या वाट्याला शस्त्रसंधीचे उल्लंघन, उरी हल्ला आणि पठाणकोटवरील हल्ला, ह्याशिवाय दुसरे काहीही आलेले नाही. ज्यावेळी दोन्ही देशांच्या शासकीय यंत्रणांकडून भारत-पाक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्या प्रत्येकवेळी पाक लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेले आहे. 
उभय राष्ट्रांतील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन राष्ट्रांमधील होणारा व्यापारसुद्धा बाधित झालेला आहे. भारत-पाक यांच्यातील सध्याचा प्रत्यक्ष व्यापार साधारणपणे दोन अब्ज डॉलर इतका आहे. ह्या व्यापारात पाकिस्तानकडून निर्यातीत सातत्य राखले जात असले, तरी भारताकडून निर्यातीत चढ-उतार होतात. मात्र, भारताचा व्यापार हा कायमच “सरप्लस’ (निर्यात जास्त, आयात कमी) आहे. 
दोन्ही राष्ट्रांमधील अप्रत्यक्ष व्यापाराचा जर अभ्यास केला तर साधारणपणे हा व्यापार प्रत्यक्ष व्यापाराच्या 10 पट अधिक आहे. पाकिस्तानातील अनेक वस्तू सुरुवातीला दुबई, सौदी अरब या राष्ट्रात जातात व तेथून भारतात येतात. भारताकडूनही अशाच प्रकारे अप्रत्यक्ष व्यापारावर भर दिला जातो याचा परिणाम म्हणजे वस्तूंच्या किमती वाढत जातात व ह्याचा फटका निर्यात क्षेत्राला बसतो. 
सुरत, अहमदाबादच्या हातमागाला लाहोर, कराची येथील शहरांमध्ये मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे सियालकोट हे शहर खेळाच्या साधनांच्या उत्पादनासाठी जगद्विख्यात आहे. येथे मोठ्या प्रमाणावर क्रिकेटच्या बॅटस्‌, हॉकी स्टिक, फुटबॉल व इतर खेळाचे सामान बनविणारे अनेक कारखाने आहेत. रशियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या “फीफा विश्‍वचषक’ स्पर्धेसाठी लागणारे फुटबॉलसुद्धा सियालकोट येथूनच मागविण्यात आले होते. खेळाच्या साहित्य निर्मितीसाठी लागणारे लाकूड, रबर व इतर कच्चा माल पाकिस्तान थायलंडकडून चढ्या किमतीमध्ये आयात करतो. भारत हासुद्धा या कच्च्या मालाचा उत्पादक देश आहे. त्यामुळे हाच कच्चा माल जर पाकने भारताकडून आयात केला तर तो थायलंडपेक्षा निश्‍चितच कमी किमतीत असेल, व त्याचा फायदा दोन्ही देशांच्या उत्पादन क्षेत्राला होऊन, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. स्वप्नरंजन वाटणाऱ्या ह्या गोष्टी तेव्हाच शक्‍य होतील जेव्हा पाक दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करेल. कारण, अर्थशास्त्र हे कधीही राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही. 
भारताशी असलेले द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी इम्रान खान पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर कारवाई करतील का? पाकिस्तानी लष्कराचा विरोधात जाण्याचे धाडस ते दाखवतील का, यांसारख्या अनेक प्रश्‍नाचे उत्तर दुर्दैवाने “नाही’ असेच आहे. वास्तविक पाकिस्तान हा स्वतःच गोंधळलेल्या स्थितीत असून जागतिक पातळीवरील त्यांची ओळख “नकारात्मक व विकासविरोधी राष्ट्र’ अशी झालेली आहे. पाकिस्तानचा जीडीपी हा दिवसेंदिवस कमी होत आहे. मानवी हक्‍कांचे येथे सर्रास उल्लंघन होते. शिक्षण, आरोग्य, नोकरी, रोजगार, उद्योग या ह्या सर्वांची पाकिस्तानमध्ये वानवा आहे. नुकतेच आर्थिक कृती दलाने (फायनान्स ऍक्‍शन टास्क फोर्स) “पाकिस्तान आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना मदत करतो’ या कारणांमुळे पुढील तीन वर्षांसाठी करड्या (ग्रे लिस्ट) यादीत टाकलेले आहे. ह्याचा थेट परिणाम पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवर होणार आहे. थोडक्‍यात पाकिस्तानची आजची अवस्था “अस्थिरतेकडून अराजकतेकडे’ अशी आहे.
इम्रान खान यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. लष्कराच्या हातचे बाहुले बनून भारताविरोधात गरळ ओकण्यापेक्षा, अनेक विधायक कामे करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पाकची जगात निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा सुधारणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. 
जम्मू आणि काश्‍मिर हा भारताचा पूर्वीपासूनच अविभाज्य भाग होता आणि यापुढेही तो राहील. त्यामुळे काश्‍मीर व भारताच्या अंतर्गत बाबीत लक्ष देऊन आपला अमूल्य वेळ न दवडता इम्रान खान यांनी पाकिस्तानला विकासाच्या मार्गावर नेले पाहिजे. हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्राथमिकता असली पाहिजे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)