#विदेशरंग : “अंपायर’चा लाडका संघ विजयी 

आरिफ शेख 

पाकिस्तानातच्या सार्वत्रिक निवडणुकीत क्रिकेटर इम्रान खान यांच्या “पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ'(पीटीआय) या पक्षाने बहुमत मिळवले. पडद्यामागील सूत्रधार असलेल्या आयएसआयने लिहिलेल्या स्क्रिप्टनुसार सर्व काही घडले. पाकचे न्यायालय, निवडणूक आयोग अन्‌ पाक लष्कराने एकत्रित प्रयत्नातून इम्रान खानला “सामनावीर’ ठरविले आहे. जेव्हा अंपायरच खेळाडूच्या बाजूने मैदानात असेल, तेव्हा यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षा करता येणार नाही. 

पाकिस्तानातील प्रस्थापित व्यवस्थेकडून निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासून या “नाटका’ची रंगीत तालीम सुरू होती. हाती थेट सत्ता घेण्यापेक्षा मुखवटा पुढं करून त्याद्वारे “रिमोट कंट्रोल’ वापरणं लष्कराला अधिक सुलभ वाटलं असावं. विरोधी पक्षात असताना आंदोलन करणं, सवंग घोषणाबाजी, प्रसंगी दमबाजी करणं एकवेळ सोपं, अन्‌ सत्तेत राहून देशाच्या समस्यांचा सामना करणं वेगळं. यातील फरक खासदारानंतर थेट पंतप्रधान झालेल्या इम्रान खानला आता समजेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकच्या इतिहासात आजवर कोणाही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. नवाज शरीफ यांच्या मागं भ्रष्टाचाराचं शुक्‍लकाष्ठ लावून त्यांना तहहयात अपात्र ठरविणं, नंतर निवडणूक काळात जेलमध्ये ठेवणं, राजकीय वारसदार असलेली कन्या मरीयम व जावयाला गजाआड करण्यामागं पाक गुप्तचर संस्था आयएसआयचा हात होता. सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती शौकत अजीज यांनी ऐन निवडणूक प्रचार काळात आयएसआयचे नाव घेऊन, ती न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला होता. मुख्य न्यायाधीशांनी विचारणा केल्यावर “तुम्ही कारवाई करणार असाल, तरच मी पुरावे देईन,’ असं प्रत्युत्तर न्या. अजीज यांनी दिलं. इम्रान खानच्या मार्गातील सर्वांत मोठा अडसर नवाज शरीफ हेच होते. त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून वाट मोकळी केली गेली. शरीफ यांच्या पक्षाच्या बलाढ्य उमेदवारांना तिकीट नाकारण्यासाठी आयएसआयकडून दमबाजी करण्यात आली. जिंकण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना इम्रान खानच्या पक्षाकडून लढण्यास सुचविण्यात आलं. शरीफ यांच्या पक्षाची मतं फोडण्यासाठी कट्टर धार्मिक गटाच्या अनेक उमेदवारांना मैदानात उतरविण्यात आलं.

नवाज शरीफ व मरीयम हे दोघे स्टार प्रचारक जेलमध्ये असताना बंधू शाहबाज यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. शरीफ यांना चहुबाजूने प्रतिकूल स्थिती, तर इम्रान खानला सर्व बाजूंनी अनुकूल वातावरण. याचा निकाल काय लागणार, हे वेगळं सांगायची गरज नव्हती. पाकमध्ये अवघं 52 टक्‍के मतदान झालं. निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर झाला. मतदानादरम्यान गडबड झाल्याची ओरड झाली नाही; मात्र मतमोजणी दरम्यान सर्रास गैरप्रकार झाल्याची तक्रार अन्य पाच प्रमुख पक्षांनी केली. शरीफ यांच्या पक्षानं तर निवडणूक निकालच अमान्य केला आहे. मतमोजणी प्रतिनिधीला बाहेर काढून मतमोजणी केली गेली. शरीफ व भुत्तोच्या पक्षानं आघाडी घेतलेल्या ठिकाणी मतमोजणी संथ करण्यात आली. नंतर निकाल बदलण्यात आल्याचे आरोप पराभूत उमेदवारांनी केले आहेत. “माझ्या राजकीय जीवनात एवढा मोठा निवडणूक फ्रॉड मी पाहिला नव्हता’, अशी प्रतिक्रिया शाहबाज शरीफ यांनी दिली. त्याला प्रत्युत्तर देताना पाकच्या इतिहासात इतकी निःपक्ष निवडणूक पहिल्यांदाच झाल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

मातब्बरांना पराभूत करण्यात जनतेपेक्षा व्यवस्थेनंच हातभार लावल्याचे आरोप झाले. पराभूतांमध्ये माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी व युसूफ रजा गिलानी यांच्यासह माजी गृहमंत्री चौधरी निसार, माजी राष्ट्रपती रफिक तरार यांचे चिरंजीव सईद तरार, राणा सनाउल्लाह, आयेशा गुलालयी, एजाजुल हक, परवेज इलाही, असफंदयार वालिखान ही नावं प्रमुख आहेत. बिलावल भुट्टो हे त्यांच्या पारंपरिक लरकानासह अन्य दोन ठिकाणांहून पराभूत झाले, तर एका ठिकाणी विजयी झाले. शाहबाज शरीफ तीनपैकी दोन ठिकाणी हरले. माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ निवडून आले. निवडणुकीत यंदा सुमारे 400 कट्टर धार्मिक नेते रिंगणात उतरले होते. मौलाना खादिम रिझवी, मौलाना फझलूर रेहमान यांच्या पक्षाला भोपळा फोडता आला नाही. मुंबई हल्ल्‌याचा मास्टर माइंड हाफीज सईदचे सर्व जागांवरचे उमेदवार तोंडावर आपटले. जमाते इस्लामी नेहमीप्रमाणे अपयशी ठरली. पराभूत झाले असले, तरी या पक्षांनी शरीफ यांच्या पक्षाचं मतविभाजन करून इम्रान खानला मदतच केली.

इम्रान खान यांना काठावर बहुमत असलं, तरी अपक्षांच्या साह्याने (व आयएसआयच्या धाकाने) पीटीआयचं सरकार अस्तित्वात येईल. पाकच्या चार प्रांतात सिंधमध्ये बिलावल भुट्टो यांच्या पक्षानं बाजी मारली आहे. बलुचिस्तान प्रांतात तेथील प्रादेशिक पक्षाचं सरकार येईल. खैबर पख्तुन ख्वा या प्रांतात इम्रान खानचा पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत येत आहे. सर्वांत मोठ्या पंजाब प्रांतात नवाज शरीफ यांचा पक्ष बहुमताच्या जवळ आहे; मात्र अपक्षांना सत्तेचं गाजर अन्‌ वेळप्रसंगी केंद्र सरकारचा धाक दाखवून तिथंसुद्धा इम्रान खानचा पक्ष बाजी मारण्याची चिन्हं आहेत.

पाकिस्तान एक अणवस्त्र संपन्न राष्ट्र आहे; मात्र त्याचे आर्थिक प्रश्‍न एवढे बिकट होत आहेत, की ताटलीत अणुबॉम्ब ठेवून आम्हाला त्या बदल्यात भाकर द्या अशी जागतिक समुदायापुढे भीक मागण्याची वेळ येऊ नये, ही पाकमधील एका ज्येष्ठ अर्थतज्ञाची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. अफगाण-पाक बॉर्डर इम्रान खानला खुली करायची आहे, म्हणजे “आ बैल मुझे मार’ सारखी वेळ दूर नाही. इराणशी संबंध मधुर ठेवताना सौदी अरेबिया दुखावला जाईल. चीनकडं कल वाढला, की अमेरिकेची खप्पा मर्जी होणार, पाकला अमेरिकीशी बरोबरीचे संबंध हवे आहेत, हे इम्रान खान एकतर्फी ठरवू शकतील का? अमेरिकेचे युद्ध आम्ही लढणार नाही, असं उघड म्हणत इम्रान खान यांनी दहशतवादाविरुद्धचा लढा तुमचा आहे, हेच सूचित केलं आहे. सर्व पाक राज्यकर्त्यांप्रमाणे काश्‍मीरचा राग त्यांनी आळविला आहे.

भारताशी व्यापारी व आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. “गोली अन बोली; एकसाथ नहें चलेंगी’ ही भारताची भूमिका ते बदलू शकत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तालिबान, अल-कायदा अन्‌ “इसिस’, तसंच त्यांच्या छुप्या पाठीराख्यांबाबत इम्रान खान चकार शब्द बोलले नाहीत. वजिरीस्तानमध्ये पाक सरकार व अमेरिकेच्या ऑपरेशन विरोधात ते कायम आवाज उठवत होते. म्हणूनच त्यांना “तालिबान खान’ म्हटलं गेलं. त्यांच्या प्रतिमेत काळानुरूप झालेले परस्परविरोधी बदलसुद्धा ध्यानात घ्यावे लागतील. ऑक्‍सफर्डचा विद्यार्थी, जिद्दी कसोटीपटू, कल्पक कर्णधार, पाश्‍चात्य विचारसरणीचा पाईक, गुलछबू व्यक्तिमत्व, डागाळलेले व्यक्तिगत जीवन अन्‌ राजकारणात प्रारंभी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आणि नंतर तालिबान-समर्थक अन्‌ आता पुन्हा सर्वसमावेशक नेतृत्वाची धरलेली वाट. यातील कोणते इम्रान खान खरे मानायचे? लष्करातून पुढं केलेला सॉफ्ट मुखवटा या प्रतिमेतून बाहेर येण्याचा त्यांनी प्रयत्न केल्यास त्यांचाही नवाज शरीफ होणं दूर नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)