विडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांचे व्याज माफ ? -पालकमंत्री

मुंबई: सोलापूर येथील विडी कामगारांना वाटप करण्यात आलेल्या घरकुलांच्या व्याजाची आकारणी माफ करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे दिली.

जुळे सोलापूर, भाग-2, हैद्राबाद रोड, सोलापूर येथे इंदिरा गांधी विडी घरकुल योजना म्हाडा योजनेअंतर्गत विडी कामगारांसाठी 3,038  घरकुल अल्प उत्पन्न गटातील विडी कामगारांसाठी बांधण्यात येऊन मासिक हप्ता पद्धतीने दि. 1 मे, 1988 पासून सदर गाळ्यांचे वाटप म्हाडाकडून करण्यात आले आहे. या घरकुलात राहणारे सर्व रहिवासी हे हातावर पोट असलेले गरीब व कष्टकरी कामगार आहेत. या घरकुलांचे मासिक हप्ते थकल्यामुळे थकित भाड्यावरील व्याज माफ करण्याची मागणी रहिवाशांतर्फे गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून यापूर्वीदेखील मंत्री,गृहनिर्माण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हैद्राबाद रोडवरील इंदिरा गांधी विडी घरकुल योजनेचे दंड व व्याज माफ करण्यासंदर्भात आज बुधवार, दि. 23 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस संजय कोळी, सभागृह नेता, सोलापूर म.न.पा.,रवी विठ्ठल नादर्गी व यादगीर राजय्या तोडंगल, विडी घरकुल रहिवाशांचे प्रतिनिधी, सुनील पडोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा प्राधिकरण, मुंबई,अशोक पाटील, मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे मंडळ,  व्ही. एस. ठाकूर, ईस्टेट मॅनेजर, म्हाडा, पुणे मंडळ, शामबाला दबडे, कक्ष अधिकारी, गृहनिर्माण विभाग हे उपस्थित होते.

या बैठकीत विडी घरकुल योजनेतील रहिवाशांचे दंड व व्याज माफ करणेबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये संबंधित रहिवाशांनी त्यांच्या घरकुलाच्या हप्त्याची सुमारे 22 हजार इतकी मूळ देय रक्कम म्हाडाकडे लवकरात लवकर भरणा करावी व त्यानंतर प्राधिकरणामार्फत दंड व व्याजाची रक्कम माफ करण्याचा सकारात्मक प्रस्ताव शासनास सादर करण्याचे ठरले. या अनुषंगाने गुरूवार दि.24 जानेवारी, 2019 रोजी सोलापूर येथे विडी घरकुल रहिवाशांची एक बैठक आयोजीत करण्यात आली असून याबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांचीदेखील भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)