विज्ञानविश्‍व: आता लक्ष अशनींकडे

डॉ. मेघश्री दळवी

अमेरिकेच्या जोडीने आता इतर देशही अवकाश संशोधनात हिरीरीने भाग घ्यायला लागले आहेत. भारताच्या चांद्र आणि मंगळ मोहिमा आहेतच, सोबत चीन आणि युरोपियन देशसुद्धा नवनवीन प्रकल्प आखत आहेत. या मोहिमांमध्ये सूर्यमालेतील ग्रह आणि त्यांचे चंद्र यांचा अभ्यास सुरू आहे. त्याशिवाय अलीकडे लक्ष जात आहे अशनींकडे.
अशनी म्हणजे ऍस्टरॉइड, अतिशय लहान ग्रह, दिसताना एखाद्या ग्रहाचा तुकडा असावा असा वेडावाकडा. मंगळ आणि गुरू ग्रहांच्या दरम्यान अशनींचा एक मोठा पट्टा आहे. या पट्ट्यात लाखोंहून अधिक अशनी आढळतात.

अशनींच्या अभ्यासाला एवढं महत्त्व का आलं आहे? एक कारण म्हणजे अशनी बहुतांशी खडकरूपात असतात आणि वातावरण नसल्याने त्यांच्या जवळ जाऊन निरीक्षण करणं सोपं असतं. या निरीक्षणांचा उपयोग ग्रहांच्या निरीक्षणांच्या संदर्भात होऊ शकतो. अशनींच्या घटकांचं रासायनिक पृथक्‍करण करून विश्वाच्या जडणघडणीचा अंदाज करता येतो.
जपानचं हायाबुसा-2 या यानाने या वर्षी 21 फेब्रुवारीला ऱ्यूगू या अशनीवरच्या खडकांचे नमुने गोळा केले. साधारण एक किमी लांबीची ही अशनी आपल्यापासून सुमारे तीस कोटी किमी अंतरावर आहे. चार वर्षांचा प्रवास करून या छोट्याशा अशनीवर अचूकपणे उतरणं ही अफाट किमया तंत्रज्ञानाची.

ऱ्यूगूवरच्या खडकांचे नमुने घेऊन हे यान 2020 मध्ये पृथ्वीवर परतेल. पहिल्यांदाच आपल्याला असे अशनीचे नमुने मिळणार आहेत. या नमुन्यांवरून विश्वाची निर्मिती कशी झाली, आणि अवकाशात सजीव तग धरू शकतात का? या प्रश्नांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

या ऐतिहासिक घटनेच्या जरा आधी म्हणजे डिसेंबर 2018 मध्ये नासाचं ओसिरिस-रेक्‍सहे यान बेनू अशनीच्या जवळ जाऊन निरीक्षण करत होतं. त्यातून हाती आलेल्या डेटाचं विश्‍लेषण करून बेनूवर पाण्याचा अंश असण्याची दाट शक्‍यता नासाने वर्तवली आहे.

अवकाशातल्या अंतरांचं प्रमाण बघता आपल्यापासून अंदाजे तीन लाख किमी दूर असलेली बेनू जवळच म्हणायची! स्वत:भोवती गरगर फिरणारी बेनू अशनी फक्त अर्धा किमी लांबी-रुंदीची आहे. नासाचं यान 2020च्या सुमारास बेनूवर प्रत्यक्ष उतरून तिथले नमुने घेऊन 2023पर्यंत पृथ्वीवर परतणार आहे.

अशनींच्या अभ्यासाचं दुसरं कारण सरळसरळ व्यावसायिक आहे. ऍस्टरॉइड माइनिंग म्हणजे अशनींचा खाणींसारखा वापर करत त्यांच्यामधून मौल्यवान धातू मिळवणं. बऱ्याच अशनींमध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅटिनम असतं. शिवाय सोनं, लोखंड, निकेल, कोबाल्ट हेही भरपूर मिळतात. अशनींवर उतरून रोबोट्‌सच्या मदतीने खाणकाम करून हे धातू मिळवणं आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं.

कॅलटेक या संस्थेने 2012 मध्ये पूर्ण अभ्यासानिशी दाखवून दिलं होतं, की अवघ्या अडीच अब्ज डॉलर्समध्ये एक अशनी आपण पृथ्वीजवळ खेचून आणू शकतो आणि तिच्यात खाणकाम करून भरपूर प्रमाणात खनिजं मिळवू शकतो. पृथ्वीवरची खनिजसंपत्ती संपली तर इतर ग्रहगोल आहेत ना, ही आता केवळ कल्पना राहिली नसून ती खात्रीने प्रत्यक्षात येऊ शकते.
ऱ्यूगू आणि बेनू यांचे नमुने आणि इतर अशनींचा दुरून अभ्यास यावरून भविष्यातल्या ऍस्टरॉइड माइनिंगचा पाया घालण्यात माणसाला निश्‍चितच यश येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.