विजय पाटील यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई – पांडु हवालदार, राम राम गंगाराम… आदी मराठी चित्रपटांबरोबरच मैने प्यार किया, हम आप के है कोन, हम साथ साथ है… अशा एकापेक्षा एक हिंदी चित्रपटांना सदाबहार संगीत देणारे ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना यंदाचा राज्य शासनातर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

दरवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांच्या नावाची शिफारस केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 रोजी नागपूर येथे झाला. त्यांना प्राथमिक संगीताच्या शिक्षणाचे धडे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवीले आणि उर्वरित शास्त्रीय संगीताचे शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था, नागपूर येथून पूर्ण केले. मुंबईमध्ये “अमर विजय’ या नावाने ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि त्यांनी 1974 साली “पांडू हवालदार’ या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड केली येथूनच त्यांच्या पुढील प्रवासास सुरुवात झाली. पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लाविल तेथे गुदगुदल्या, आली अंगावर, आपली माणसं, हिच खरी दौलत, दीड शहाणे, लेक चालली सासरला, देवता या सर्व दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसाठी राम लक्ष्मण यांनी संगीत दिले.

तसेच त्यांनी एजंट विनोद, तराणा, हम से बडकर कौन, मैने प्यार किया, हम आप के है कोन, हम साथ साथ है, 100 डेज, अनमोल, पोलिस पब्लिक, सातवा आसमान, पत्थर के फुल या हिंदी चित्रपटांना त्यांनी बहारदार संगीत दिले. त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपट सृष्टीला 150 हून अधिक चित्रपटांना संगीत देऊन आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)