विजयादशमी : ‘आरटीओ’ला सुमारे दहा कोटींचे उत्पन्न

वाहन नोंदणीत ३८ टक्के वाढ, तरीही उत्पन्न घटले, चारचाकी घटल्या, दुचाकी व्यावसायिक वाहने वाढली 

पिंपरी – देशभरातील वाहन उद्योगावर गेल्या सहा महिन्यांपासून मंदीचे सावट आहे. परंतु पिंपरी-चिंचवड शहरात यावर्षी दसऱ्याला वाहन नोंदणीचा नवा विक्रम स्थापित झाला आहे. मंदीच्या काळातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणीमध्ये तब्बल 38 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. या वाहन नोंदणीमुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाला 9 कोटी 79 लाख9 हजार 323 रुपयाचा महसूल मिळाला आहे.

यावर्षी नवीन 4 हजार 826 वाहनांची नोंद झाली आहे. तसेच यावेळी नागरिकांनी ई-वाहनांनाही पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. वाहन नोंदणी वाढली असली तरी आरटीओच्या उत्पन्नात मात्र मोठी घट झाली आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमी नवीन वाहन, वस्तू, घर खरेदी करण्याची परंपरा आहे. दरवर्षी दसऱ्याला मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. यावर्षी प्रचंड मंदी असतानाही नागरिकांनी वाहन खरेदी केल्याचे नोंदणीवरुन दिसून येत आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर नवीन 4 हजार 826 वाहनांची नोंद झाली आहे. यावर्षी 2949 दुचाकी, 723 हलकी चारचाकी वाहने, 949 ट्रान्सपोर्टसाठीची चारचाकी वाहने आणि 205 इलेक्‍ट्रिक वाहनांची नोंद
झाली आहे.

आता दिवाळीची प्रतीक्षा –
मंदीच्या काळातही चांगली वाहन विक्री झाल्याने शहरातील वाहन व्यावसायिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. येत्या दिवाळीत विक्रीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत चारचाकींची विक्री मात्र घटली असल्याने मोठे डीलर्स मात्र चिंतेत आहेत.

ई-वाहनांच्या नोंदणीत वाढ –
पर्यावरणासाठी इलेक्‍ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याचे धोरण देशभर राबविण्यात येत आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांमध्ये वाढ व्हावी, यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना यावर्षी काही अंशी यश मिळालेले आहे. गेल्या वर्षी दसऱ्याला केवळ सात इलेक्‍ट्रिक वाहनांची नोंद झाली होती. यावर्षी यात मोठी वाढ झाली असून सुमारे 205 इलेक्‍ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरात पेट्रोल पंपाप्रमाणे चार्जिंग पॉईंटही पहायला मिळण्याची शक्‍यता आहे.

म्हणून कमी झाले उत्पन्न –
गेल्या वर्षी दसऱ्याला 3377 वाहनांची नोंदणी झाली होती. यावर्षी 1449 अधिक वाहनांची वाढ झाली असून एकूण 4826 वाहनांची नोंद झाली आहे. वाहनांची नोंदणी अधिक होऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत आरटीओच्या उत्पन्नात मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा चारचाकी वाहने कमी झाली आहेत. कंपन्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वाहनांचा शुल्क अधिक असतो तर खासगी वाहनांचा कमी. गेल्यावर्षी उद्योगनगरीतील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली होती. परंतु यंदा मात्र कंपन्यांना मंदीची झळ बसल्याने कंपन्यांनी वाहन खरेदी केली नाही. याचा मोठा फटका आरटीओच्या उत्पन्नाला बसला आहे. गेल्या वर्षी 3377 वाहनांची नोंदणी होऊनही आरटीओला 17 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.