विचार : हसरा कट्टा

अमोल भालेराव 

सकाळी 6 चा गजर होताच नानांना जाग आली. माधवरावांना सगळे नाना म्हणून ओळखत. सीमेवर लढायला जाणारा मेजर जसा तयार व्हावा, तसे नाना मॉर्निंग वॉक ला जाण्याच्या तयारीला लागले. हातात घड्याळ, अंगात स्वेटर, डोक्‍यावर कानटोपी आणि उतारवयात हक्काने जिच्या हाताला धरून चालावे अशी मैत्रीण म्हणजे त्यांची ‘काठी’ घेऊन नाना घरातून बाहेर पडणार, तेवढ्यात त्यांच्या सौ. चा म्हणजेच, नानींचा आवाज आला, ‘अंगात स्वेटर घाला, आज थंडी जरा जास्तच आहे. आणि हो कवळी बरोबर घेतलीय ना ? अरे हो, बत्तीस सैनिकांची पलटण मागेच राहायची. हो घेतली, जातो बघ मी.’ असं म्हणून नानांची स्वारी निघाली. वाटेतच त्यांच्या मित्राच सदानंदच घर. वरच्या माळ्यावर राहणाऱ्या सदानंद काकांना खाली बोलावताना नानांनी सवयीप्रमाणे शीळ मारली.

सदा काका खाली आले, ‘लेका माधवा वयाची ‘साठी’ गाठलीस पण तुझी शीळ मात्र आजही ‘विशी’ तलीच वाटते बघ, तेवढीच तरुण. नाना तसे खुमासदारपणे म्हणाले,’ अरे तुझ्या वहिनीला पाहून मारलेली ‘ती’ पहिली शीळ आजही ओठावर रेंगाळतेय बघ.’ दोघेही हसत आणि गप्पाटप्पा करत गार्डनमध्ये पोचले. तिथे कट्ट्यावर आधीच अनंता आणि वसंता हजर होते. ‘काय वसंता आज स्वारी आमच्या आधी पोचली.’ ‘ अरे नाना, आज सूनबाईंनी गाडीतून सोडलं. तिला म्हंटल मी मॉर्निंग वॉक ला चाललोय, तर उलट मला म्हणते कशी, बाबा तुम्ही एक दिवस म्हणून वॉक ला जाता आणि नंतर गुडघे दुखतात म्हणून आईंना चार दिवस मालीश करायला लागते.मग काय, आलो गुपचूप गाडीत बसून.’ बागेत फेरफटका मारून चौघेही’हसऱ्या कट्ट्यावर’ आले.

हसण्याचा व्यायाम असं म्हणा किंवा उरलेल्या आयुष्यात दुःख न आठवत जगण्याचा. थोडा वेळ हातातील काठ्या बाजूला ठेवत, एकमेकांचा हात हाती घेऊन आधार देत सारेजण गोल रिंगण करून उभे राहिले. नाना या ग्रुपचे मुख्य, ते रिंगणात मधोमध थांबायचे. आपले हात कधी एकदम उभे 90 अंशात तर कधी शरीराचा तोल सांभाळत कमीअधिक अंशात वर आणि पुन्हा खाली घेत सारेजण हसू लागले. चेहऱ्यावर सुरकुत्यांची झालेली दाटी हसताना मात्र काही वेळ का होईना, विखुरलेली वाटायची. नाना दिमाखात आपल्या ‘हिरड्यांच्या’ भिंतीवर सोबत आणलेली ‘ती’ 32 जवानांची पलटण घेऊन हसायचे. तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून बाकीचे पण आपापली फौज घेऊन तयार, कधी समोरचे दोन सैनिक नसायचे, कधी डावीकडचे तर कधी उजव्या रांगेतले…!

अर्धा तास हसण्याची लढाई खेळून झाल्यावर हे चौघेही दमून एका ठिकाणी निवांत बसले. तेवढ्यात तिथं एक नवविवाहित जोडपं आलं. ‘बाबा नमस्कार, मी शशांक आणि ही माझी बायको माधवी. आम्ही गेल्या काही दिवसांपासून रोज तुम्हाला पाहतोय. का कुणास ठाऊक पण तुमच्याबरोबर बोलायची इच्छा झाली. आम्हाला पण घेता का तुमच्या ग्रुपमध्ये ?’ नाना त्याच्याकडे पाहत, म्हणाले, अरे बागेत एवढी ‘ताजीतवानी’ झाडं सोडून तू या ‘सुकलेल्या’ आणि ‘जुनाट’ खोडांकडं कशाला आलास ? आणि काय करता तुम्ही दोघे ?’ शशांक काही बोलणार इतक्‍यात माधवी, ‘ बाबा आम्ही दोघंही डॉक्‍टर आहोत. जवळच राहतो इथे. खरं तर मीच शशांकला हट्ट करीत होते तुमच्याशी बोलायचं म्हणून. आणि आमच्या नजरेत हे झाडं आजही तितकच बहारदार आणि टवटवीत दिसतंय. तुमचं निखळ हास्य पाहून असं वाटतंय की या झाडांची पानं आजही तेवढाच सळसळ आवाज करत नव्यानेच पालवी फुटलेल्या झाडांना पण लाजवतायत. बाबा आम्ही दोघंही अनाथ आहोत, त्यामुळं आमच्या डोक्‍यावर कधी कुणाची प्रेमाची सावली पडलीच नाही.’ माधवीचं बोलणं ऐकून क्षणात हसऱ्या कट्ट्यावर नि:शब्द शांतता पसरली. ते चौघेही शांत होऊन एकमेकांकडे पाहू लागले. तितक्‍यात नानांनी डोळ्यावर चष्मा चढवत खिशातून मोबाइल काढून माधवीकडे दिला. ‘ यातून नानीचा नंबर काढून तो लाव बरं आणि माझ्याकडं दे. ” हं, हॅलो नानी, अगं मी बोलतोय, आज रात्री आपल्याकडं माधवी आणि शशांक जेवायला येताय बरं.

कोण माधवी ? अगं आपल्या मनूची वर्गमैत्रिण आहे आज अचानक इथे भेटली. तुझी नसेल ओळख बहुदा, घरी आल्यावर सांगतो तुला सगळं.’ म्हणत नानांनी फोन ठेवून दिला, तसे सदाकाका उठून नानांजवळ जाऊन बसले. नानांचे थरथरते हात हाती घेत माधवीकडे पाहून,’मानसी, नानांची एकुलती एक मुलगी. काही दिवसांपूर्वीच एका अपघातात तिचं निधन झालं. नानांनी तुझी खोटी ओळख करून दिली मनूच्या आईला. पण म्हणतात ना प्रेमात सारं काही माफ असतं. खूप जीव होता तिच्या आईचा तिच्यावर. कदाचित तुझ्या रूपात काही वेळ का होईना, नानाला मनू दिसली असावी बघ.’ हे ऐकून माधवीच्या डोळ्यात पाणी आले. नाना स्वतःला सावरत म्हणाले, ‘अरे शशांक माझी काठी घरी विसरली बघ. ही नाही रे बाबा, ते सेल्फी स्टिक की काय म्हणतात, ना ती. एक सेल्फी घे बरं माझ्या मोबाइलमध्ये आपल्या सर्वांची. थांब जरा आधी माझी कवळी नीट लावू दे मला.’ साऱ्यांच्या पाणावलेल्या डोळ्यात नानांच्या बोलण्याने चटकन हसू तरळले आणि ‘स्माईल प्लीज’ म्हणत ‘हसरा कट्टा’ पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हसरा झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)