विघ्नहराच्या दर्शनाला दीड लाख भाविक

ओझर- संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकातील मुख्य स्थान श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी दिली. पहाटे पाच वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष सूर्यकांत रवळे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त साहेबराव मांडे, प्रकाश मांडे, ज्ञानेश्वर कवडे, शंकर कवडे, बबन मांडे, अनिल मांडे आणि ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत भाविकांनी रांगेत दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी साडेसात वाजता आणि दुपारी बारा वाजता माध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले, त्यानंतर साडेदहा वाजता श्रीस नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, चप्पल स्टॅंड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन इत्यादी व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला आणि चंद्रोदयापर्यंत हभप साईनाथ महाराज गुंजाळ (तेजेवाडी) यांचे रात्री चंद्रोदय होईपर्यंत हरीकीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ, शिरोली खुर्द यांनी दिली. रात्री साडेदहा वाजता शेजआरती करून अकरा वाजता मंदिर बंद करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.