विखेंची दुसरी कारकीर्दही गाजतेय घोटाळ्यांनी

झेडपीत हायमास्टसाठी साडेपाच कोटींची उधळपट्टी; “हात’सफाईसाठी मार्जिन जास्त
* जयंत कुलकर्णी*
नगर – जिल्हा परिषद संगणक प्रशिक्षण, चिक्‍की वाटप, कपाट खरेदी घोटाळ्यामुळे आधीच बदनाम झाली असताना आता नव्याने हायमास्ट दिव्यांचा घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा परिषदेत गेल्या पाच-सहा वर्षांपासून घोटाळ्याची मालिका सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांची दुसरी कारकीर्दही घोटाळ्यांनी गाजण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मार्जिन मोठ्या प्रमाणावर असल्याने हायमास्ट दिवे बसविण्याकडे यंदा कल वाढला असून जिल्ह्यात तब्बल 971 हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी साडेपाच कोटींची उधळपट्टी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. त्यात जिल्हा परिषद सेस, खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधी, 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतील व्याज, नावीन्यपूर्ण योजना व डोंगरी विकास कार्यक्रम यामधून उपलब्ध झालेल्या निधीतून जिल्ह्यात 971 हायमास्ट दिवे उभारण्यात आले आहेत. अर्थात यासाठी वेगवेगळी पद्धत वापरण्यात आली आहे. काही हायमास्ट दिव्यांसाठी कोटेशन पद्धत तर काहींसाठी निविदा पद्धत राबविण्यात आली आहे; परंतु पद्धत कोणतीही असली तरी प्रत्येक हायमास्ट दिव्यासाठी स्वतंत्र पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे या पद्धतीत संशयाला मोठी जागा आहे. बाजारभाव व ऑनलाईन खरेदीच्या किमतीपेक्षाही अव्वाच्या सव्वा किमती कोटेशन व निविदा पद्धतीमध्ये लावण्यात आल्या आहेत. बाजारभाव व ऑनलाईन खरेदीची किंमत पाहिली असता सध्याच्या उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यापेक्षा दुप्पट हायमास्ट दिवे उभारण्यात आले असते. बांधकाम विभागाच्या दक्षिण विभागात 359 तर उत्तर विभागात तब्बल 612 हायमास्ट दिवे उभारण्यात आले आहेत.
निविदाधारक 13 असले तरी कामे मात्र चार ठेकेदारांकडून करण्यात आली आहेत. उर्वरीत निविदाधारक केवळ कामे घेण्यापुरते कागदावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत हायमास्ट दिव्यांच्या खरेदीमध्ये अनियमिता झाल्याचा प्रकार “दैनिक प्रभात’ने उघडकीस आणल्यानंतर जिल्हा परिषद वर्तुळात दबक्‍या आवाजात त्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, या हायमास्ट दिव्यांच्या खरेदीच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे आता समोर आले आहे. सुरवातीला 300 त्यानंतर 600 हायमॉस्ट दिवे बसविण्यात आल्याची चर्चा होती; परंतु आता तब्बल 971 हायमास्ट दिवे बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. खरेदीच्या किमतीदेखील वेगवेगळ्या आहेत. काहींची खरेदी 62 हजार, काहींची 65 हजार, काहींची 58 हजार तर काहींची खरेदी किंमत 60 हजार रुपये दाखविण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर हायमास्ट दिव्यांच्या खरेदीसाठी एकत्रित निविदा काढण्याची आवश्‍यक असताना स्वतंत्रपणे खरेदी करण्यात आली आहे. यामागचे गौडबंगाल काय असा सवाल उपस्थित होतो आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून विद्युत विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांकडून ही सर्व कामे करण्यात आली आहेत. 971 हायमास्ट दिव्यांसाठी तब्बल साडेपाच कोटींची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यातून आवश्‍यक ती विकासकामे झाली असती; पण त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे.

पूर्वी संगणक घोटाळा अन्‌ आता हायमास्ट
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे यांच्या पहिल्या कारकीर्दीत संगणक प्रशिक्षण घोटाळा चांगलाच गाजला होता. तब्बल 58 लाखांचा हा घोटाळा झाला होता. त्यात मिटकॉन कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. गटविकास अधिकाऱ्यांसह महिला व बालकल्याण समितीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी झाली; परंतु त्यानंतर या घोटाळ्यावर पदडा पडला. आता त्यांच्या दुसऱ्या कारकीर्दीत हायमॉस्ट दिवे घोटाळा उघडकीस आला आहे; परंतु त्याची चर्चा होणार नाही. त्यादृष्टीने यंत्रणा कार्य करीत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सीईओं’च्या भूमिककडे आता लक्ष
हायमॉस्ट घोटाळ्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तूळात सुरू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने यांनी याप्रकरणाकडे लक्ष दिले. त्यांनी तातडीने बांधकाम विभागाकडून सर्व माहिती घेवून तपासणी देखील केली आहे. पत्रकारांशी बोलतांना माने यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतू अद्यापही त्यांनी तसे आदेश न दिल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

विरोधक शांत
जिल्हा परिषदेत इतर विकासकामांवर आरडाओरडा करणारे विरोधक या हायमास्ट दिव्यांच्या घोटाळ्याबाबत शांत असल्याचे दिसते आहे. भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर आरोप केले; पण आज तेही या विषयावर मौन बाळगून आहेत.

खा. लोखंडेंनी लावले 335 दिवे!
खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल 335 हायमास्ट दिवे बसविले आहेत. अन्य विकासकामांची मागणी करूनही त्याकडे लक्ष न देता हे हायमास्ट दिवे बसविण्याकडे त्यांचा कल दिसला. विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्युत अधिकारी असताना त्याऐवजी दक्षिणेतील अधिकाऱ्यांकडे या हायमास्ट दिव्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सारे संशयास्पद वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)