विक्रीमुळे शेअरबाजारात गळती चालूच 

सलग पाचव्या दिवशी निर्देशांकांत घट : एनबीएफसींचे शेअर पिछाडीवर 
मुंबई: खराब जागतिक वातावरण तसेच देशातील स्थूल अर्थव्यवस्थेबाबत निर्माण झालेल्या शंकामुळे शेअरबाजारात विक्रीचे सत्र आज तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. सप्टेंबर हा महिना शेअरबाजारासाठी अत्यंत खराब गेला आहे. या महिन्यांत मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 2417 अंकांनी म्हणजे 6.26 अंकांनी कमी झाला आहे.
जागतिक बाजारात क्रुडचे दर कमी होण्याची शक्‍यता मावळत आहे. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य स्थिर होताना दिसत नाही. त्यातच आता पुढील आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र बाजारात आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 97 अंकांनी कमी होऊन 36227 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 47 अंकांनी कमी होऊन 10930 अंकांवर बंद झाला.
गेल्या चार आठवड्यांपासून शेअर निर्देशांक एकतर्फी कमी होत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना निर्देशांकांचा तळ नेमका कुठे आहे, याचा अंदाज यायला तयार नसल्याचे वातावरण शेअरबाजारात कायम आहे. काल झालेल्या व्यवहारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 552 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 146 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
या घटनाक्रमाबाबत बोलताना जिओजी वित्तीय सेवा या कंपनीचे मुख्य संशोधन अधिकारी विनोद नायर यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांना निर्देशांक कोणत्या पातळीवर स्थिरावणार याचा अंदाज लागणे कठीण झाले आहे. भांडवल सुलभतेचा प्रश्‍न कसा सुटणार आहे, याची खात्री वाटणाऱ्या घडामोडी बाजारात होताना दिसत नाहीत. त्यामुळे एक तर गुंतवणूकदार विक्री करीत आहेत किंवा कुंपणावर बसून आहेत. त्यातल्या त्यात काही बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्याचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती कायम आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)