विक्रीचा उडीद शेतकऱ्याने आणला तहसील कार्यालयात

जामखेड – विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणलेला उडीद व्यापाऱ्यांच्या संपामुळे विकला न गेल्याने नायगाव येथील शेतकरी भिमराव पाटील यांनी चक्क तहसील कार्यालयात आणुन ठेवला. तसेच ताबडतोब शासकीय हमीभाव केंद्र सुरु न केल्यास शेतकऱ्यांनी आणलेले मुग व उडीद तहसील कार्यालयात उतरवून आंदोलन छेडण्याचा इशारा येथील जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी उडीद मुगाची काढणी सुरू केली. मात्र, हमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकऱ्यांना करावी लागली आहे. आता शेतकरी व्यापाऱ्यांकडून पूर्णत: नागवला गेल्यानंतर शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नायगाव येथील शेतकरी भिमराव पाटील यांनी आपल्या कॉलेजला शिकत असलेल्या मुलीसाठी पास काढायचा होता. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आपला काढलेला दोन पोते उडीद विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांकडे आणला. मात्र व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी करणे बंद केले. तसेच बाजार समितीच्या आवारात पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे शेतकरी पाटील यांनी चक्क आपला उडीद विक्री होत नसल्याने तहसील कार्यालयात आणुन ठेवला.
या प्रकरणी जिव्हाळा संघटनेने गंभीर दखल घेत संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सुनिल लोंढे, प्रा. मधुकर राळेभात, शहाजी डोके, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय वारे, नामदेव राळेभात, सिद्धार्थ घायतडक, गुलाब जांभळे, शिवाजी सातव, सागर कांबळे, रामचंद्र इंगळे, विठ्ठल राऊत,आरपीआयचे सुनील साळवे यांनी शासकीय हमीभाव केंद्र सुरू करावे. यासाठी नायब तहसीलदार विजय भंडारी यांना निवेदन दिले. तसेच शासनाच्या वतीने लवकरात लवकर शासकीय हमीभाव केंद्र सुरु न केल्यास शेतकऱ्यांनी आणलेले मुग व उडीद तहसील कार्यालयात उतरवून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)